

Maratha Reservation Latest News : मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे. त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असून अद्याप तोडगा निघालेला नाही. असे असताना आता नाशिकमधून सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यासंदर्भात मराठा समन्वयक करण गायकर यांनी थेट मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गायकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेतली. ते म्हणाले, विखे पाटील हे समाजाची दिशाभूल करत असून, गेल्या वर्षभरात SEBC आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी एकही ठोस भूमिका घेतली नाही. SEBC आरक्षण घालविण्याचा विखे पाटलांचा कुटील डाव असल्याचा आरोप गायकर यांनी केला.
उपसमितीचे अध्यक्ष असून विखे पाटील हे मराठा समाजाशी बोलत नाहीत. बैठक घेत नाहीत. समाजासाठी काय करत आहेत, ते देखील सांगत नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात नसल्याने विखे पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असे आवाहन गायकर यांनी केले. यावेळी विखे पाटलांचा उल्लेख गायकर यांनी 'मराठाविरोधी' असा केला.
गायकर पुढे म्हणाले, उपसमितीतील इतर मंत्री काय करतात, हा देखील प्रश्न आहे. सारथी संस्थेची वाट लावण्याचे काम या उपसमितीने केले आहे. भविष्यात EWS प्रमाणे SEBC आरक्षणही घालवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावे आणि ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना SEBC आरक्षण द्यावे अशी मागणी गायकर यांनी केली.
SCBC आरक्षण टिकवण्यासाठी काही केलं जात नाहीये, येत्या ८ तारखेला मुंबईत राज्यव्यापी बैठक घेऊन SEBC आरक्षण टिकवण्यासाठी लढा उभारण्याची घोषणा करण गायकर यांनी केली आहे. कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावे आणि ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना SEBC आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
जरांगे पाटलांनी SEBC वर बोलावं.....
जरांगे पाटील यांनीही SEBC आरक्षणावर स्पष्टपणे बोलले पाहिजे. आम्ही अनेक वेळा त्यांच्यासमोर आमची भूमिका मांडली आहे. ते गॅझेटच्या लढ्याला पुढे नेत आहेत, मात्र सरकार त्यांची फसवणूक करत आहे. निर्णय घेण्याच्या वेळी आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. मुंबईत अभ्यासकांनी जरांगे पाटील यांना सर्व मागण्या योग्य आणि मान्य असल्याचे सांगितले, त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार?
SEBC आरक्षणाला पाठिंबा द्यायचा की नाही, हा आता जरांगे पाटील यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचा लढा उभारणार आहोत. येत्या ८ तारखेला मुंबईत राजकीय जोडे बाजूला ठेवून राज्यव्यापी बैठक घेणार आहोत. त्यांना निमंत्रण देऊ. ते सोबत आले तर ठीक; अन्यथा आम्ही आमचा लढा उभारू असेही गायकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.