Ahmednagar News: कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि लेखाधिकारी नयना कुंभार यांच्या वादात कर्मचाऱ्यांनी उडी घेतली आहे. यामुळे वादाला वेगळे वळण लागले असून, नयना कुंभार या एकट्या पडल्या आहेत. नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी कर्जत पोलिसांची भेट घेत नामदेव राऊत यांची बाजू घेतली आहे. तसे निवेदन देखील दिले आहे. यावर कर्जत पोलिस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. (Karjart Nagar Panchayat)
नगरपंचायतीमधील कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी कर्जत पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेत निवेदन दिले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत यांच्यावर दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. दाखल गुन्ह्याची सत्यता पडताळून पाहावी, तसेच महासंग्राम युवा मंचने देखील नामदेव राऊत यांच्यावर दाखल चुकीचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर्जत नगरपंचायतीचे लेखापाल यांनी नामदेव राऊत यांच्यावर दाखल केलेला गुन्हा पूर्णपणे चुकीचा असून घटनेवेळी आम्ही काही कर्मचारी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित होतो. नामदेव राऊत हे नगरपंचायतीचे नगरसेवक असल्याने त्यांनी लेखापाल यांना कर्जत नगरपंचायतीचे बँक खाते आयकर विभागाने सील केले याबाबत चर्चा करीत होते. त्यामध्ये बोलणे सुरू असताना दोघांमध्ये चढ्या आवाजात चर्चा झाली. परंतु सरकारी कामात अडथळा आणण्यासारखा व विनयभंग यासारखा प्रकार घडलेला नाही, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
लेखापाल यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असून आम्ही त्याचा निषेध करीत आहे. नामदेव राऊत यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी आणि सफाई कामगारांनी कर्जत पोलिस निरीक्षकांना दिले.
या निवेदनावर आर.एस.गदादे,संतोष समुद्र, ए.एम.गीते, ए.एस.मोहोळकर, एस.आर. राऊत, व्ही.एम.शिंदे, बुवासाहेब कदम, अवधूत कदम, सचिन पवार, कुंडलिक पवार, सफाई कर्मचारी सुलन भैलुमे, मंगल लोंढे, लीला कांबळे, गयाबाई भैलूमे यांच्या सह्या आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.