Nashik Political News : काय करणार, काय केले, याचा गाजावाजा करणे, हा माझा स्वभाव नाही. शेकडो कोटींचा निधी, मोठ्या घोषणा याऐवजी नाशिक शहर राहण्यायोग्य होणे याला माझे प्राधान्य असेल, असं विधान ठाकरे गटाचे नाशिकमधील उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau waje ) यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी त्यांनी संपर्क केला आहे. या सर्व प्रचारात अनेक नागरिक अतिशय उत्साहाने पुढे येऊन आपले स्वागत करीत होते.
मतदारांनी आजवर हाय फाय आणि घोषणांचा पाऊस पाहिला आहे. त्यातून नाशिकच्या पदरात काहीच पडलेले नाही, अशी मतदारांची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते यांसह विविध वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणात असूनही भटकेबाजपणा आणि केलेल्या कामाचे गुणगान यापासून अलिप्त असलेल्या माजी आमदार वाजे यांचा साधेपणा नाशिकच्या मतदारांना भावला आहे. त्याबाबत अनेक समाज घटकांनी त्यांना स्वतःहून पुढे येत पाठिंबा दिला आहे. या संदर्भात ते म्हणाले, "आज नाशिक शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग, सार्वजनिक आरोग्य, नागरी व्यवस्था असे गंभीर प्रश्न आहेत. कोणत्याही राजकीय पक्ष आणि मोठ्या नेत्यांच्या यादीत हे विषय नाहीत.
नाशिकचे नागरिक वाहतूक कोंडीने अतिशय त्रस्त आहेत. इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका, उपनगर, सिटी सेंटर मॉल यापासून तर अनेक चौकांमध्ये नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. शहरात वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सामान्य नागरिकांना आरोग्य आणि उपचाराच्या सुविधा यावर गेल्या दहा वर्षांत काहीच झालेले नाही."
"मोठ मोठे खासगी दवाखाने आहेत. पण गरीब माणूस तिथे उपचारासाठी जाऊ शकत नाही. अनेक शासकीय रुग्णालये आहेत. त्याचे व्यवस्थापन ढिसाळ झाले आहे. त्यात सुसूत्रता आणि उपाय केल्यास नाशिकच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक शहर मोठ्या मोठ्या घोषणांनी नव्हे तर व्यवस्थेच्या अंगाने व प्रशासकीय सुधारणांनी राहण्यायोग्य बनविणे याला माझे प्राधान्य असे," असं वाजे यांनी सांगितलं.
माजी आमदार वाजे हे ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात, अशी टीका त्यांचे विरोधक करतात. त्याचा समाचार वाजे यांनी घेतला. वाजेंनी म्हटलं, "मी असा लोकप्रतिनिधी आहे की, लोकांनी त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही. मी त्यांच्याकडे जातो. त्यांचे प्रश्न समजून घेतो आणि सोडवतो.
त्यामुळे माझ्या विरोधकांनी निवडणुकीनंतर जनतेशी येणाऱ्या संपर्कबाबत काळजी करू नये. मी नाशिक शहरात मतदारांशी संपर्कासाठी उत्तम व्यवस्था असलेले कार्यालय उभारणार आहे. मी सिन्नर सारख्या भागातील आहे. सिन्नरमध्ये मोठी एमआयडीसी आहे. तेथील उद्योजक आणि कामगार यांच्यात समन्वय साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर मी काम केले आहे.
नाशिकमध्येही कामगार आणि उद्योजक यांच्या समस्या आहेत. त्यात मार्ग काढला जाईल. नाशिक शहरातदेखील ग्रामीण भागातून आलेले नागरिकच वास्तव्य करतात. त्यांना शहराची जाण नाही असे कसे म्हणता येईल?"
"शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार असलो तरीही महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांनी अतिशय पुढाकार घेऊन प्रचार यंत्रणा निर्माण केली आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. समाजकारणाला प्राधान्य देऊन नाशिक मतदारसंघाचा विकास मी करणार आहे.
फक्त राजकीय नव्हे तर अनेक बिगर राजकीय संस्थांनी मला पाठिंबा व्यक्त केला आहे. उमेदवारी मिळाली तेव्हा मला याचा अंदाजदेखील नव्हता. त्याच्या कितीतरी पट लोक पुढे येऊन काम करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे. या निवडणुकीचा निकाल शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने लागणार आहे," असा विश्वास वाजेंनी व्यक्त केला.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.