Nagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच ट्रोल झाले असे असले, तरी खासदार विखे त्यांच्या भाषेच्या मुद्यावर ठाम आहेत. "मला मराठी भाषेचा गर्व आणि अभिमान आहे. संसदेतील कामकाजाव्यतिरिक्त मतदारसंघातील कामांसाठी अधिकाऱ्यांशी इंग्रजीतून संवाद साधावा लागतो. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संसदेत आहेत. भाषेच्या मुद्द्यावरून मला ट्रोल करण्यापेक्षा त्यांचे खासदार संसदेत कोणत्या भाषेचा वापर करतात, याचा अभ्यास करावा", असा मुद्दा खासदार सुजय विखेंनी 'सरकारनामा'शी बोलताना उपस्थित केला.
गेल्या पंचवार्षिकला आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवताना खासदार सुजय विखेंनी संसदेत इंग्रजी आणि कमीत कमी हिंदी बोलता आले पाहिजे, असे आव्हान दिले होते. खासदार विखेंच्या या भाषेच्या राजकीय गुगलीवर आमदार जगताप पायचीत झाले. हाच जुना बाण खासदार विखेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यावर सुरुवातीला वापरला. पण या वेळी खासदार विखेंवर हा बाण उलटला आणि समाज माध्यमांमध्ये ट्रोल झाले.
नीलेश लंकेंनी भाषेच्या मुद्द्यावरून खासदार विखेंची हवाच काढून घेतली. आम्हा गरिबांचे झेडपीच्या शाळेतून शिक्षण झाले आहे, असे नीलेश लंके म्हणताच, खासदार विखे समाज माध्यमांवर ट्रोल झाले. नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी नगर शहरात झाला. आमदार रोहित पवार यांनी भाषणाचा सुरुवात करताना मराठीतून बोलू की, इंग्रजीतून, असे म्हणत खासदार विखेंना चिमटा काढला. आजही या मुद्द्यांवर खासदार विखे ट्रोल होत आहेत. परंतु खासदार विखे भाषेच्या मुद्द्यावर आजही आग्रही आहेत.
खासदार सुजय विखे म्हणाले, "लोकसभा संसद भवनामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक भषेत बोलू शकता. माझी भाषा मराठी आहे, तर ती मी बोलू शकतो. परंतु संसद भवनव्यक्तिरिक्त दिल्लीतील आयएस आणि इतर अधिकाऱ्यांकडून मतदारसंघातील काम करून घ्यायचे म्हटल्यावर तिथे भाषेची अडचण येते". नगर शहराला लष्करी तळ आहे. येथील प्रश्न थेट लष्करी खात्याशी आणि केंद्राच्या अख्यारीत येतात. तसे ते जोडले गेलेत. त्यांच्यासमोर बोलायचे म्हटल्यावर दोन प्रमुख भाषा येणे गरजेचे आहे.
इंग्रजी आणि हिंदी! लष्करप्रमुख नाॅर्थचे असल्यावर त्यांच्यासमोर जिल्ह्याचे प्रश्न मांडायला ट्रान्सलेटर घेऊन जायचे का? दिल्लीत जेवढे आयएस आॅफिसर किंवा डिफेन्स सेक्रेटरी आहेत, त्यांच्यासमोर प्रश्न मांडताना इंग्रजी आलीच पाहिजे, हे मागील पाच वर्षांत मी अनुभवले आहे. किमान कमीत-कमी हिंदी तरी व्यवस्थित आलीच पाहिजे. आयएस किंवा लष्करप्रमुख, त्यांचे सेक्रेटरी यांना मराठी काय कळणार, असे खासदार विखे यांनी म्हटले.
नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय हा डिफेन्समध्ये (केंद्रीय संरक्षण विभागात) अडकला होता. तो मार्गी लावण्यासाठी लष्करप्रमुखांना भेटलो. तिथे मराठीत बोलणे शक्यच नव्हते. नगर शहरातील उड्डाणपुलाच्या प्रश्नासह जे काही विकासकामे करू शकलो, आणि ते संसदेमध्ये मांडू शकलो, ते केवळ माझ्या शिक्षणामुळे आणि सुशिक्षित असल्यामुळेच! आज ज्या काही खासदारांना भाषेची अडचण आहे, त्यांच्या मतदारसंघात काय विकास झाला आहे, ते जाऊन पाहा, असेही खासदार विखेंनी म्हटले.
मराठी बोलण्याबद्दल मला आक्षेप नाही. मला मराठीचा गर्व आणि अभिमान आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर दिल्लीमध्ये काम करत असताना, इंग्रजी व्यवस्थित बोलता आले पाहिजे. कामाविषयी दिल्लीत बोलताना किंवा प्रश्न मांडताना त्याचा प्रभाव पडला पाहिजे. अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर, तो कागद पाहतो. अरे तुम्ही न्यूरोसर्जन आहात. तो लगेचच बसायला सांगतो. त्याला लगेच कळते. कम्युनिकेशनमध्ये अडचण येत नाहीत. दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यावर इतरांना मध्यस्थी घेता येत नाही. आपला प्रभाव असा पडला पाहिजे की, काम लगेच झाले पाहिजे, असेही खासदार विखे यांनी म्हटले.
आंबेडकरांचे दिले उदाहरण....
प्रत्येक अध्यादेश इंग्लिशमध्ये निघतो. हिंदीमध्ये असतो, अध्यादेशातील हिंदी लवकर समजत नाही. मग आपण एक शिक्षक ठेवायचा का? हिंदी ट्रान्सलेट करून घ्यायची का? ते देखील करायला अडचण नाही. मी माझा अनुभव सांगितला. मी कोणत्याही व्यक्तीला हिणवले नाही. शिक्षण आणि गरीबाचा मुद्दा येथे येतोच कसा? पारनेर तालुक्यातील गेल्या दोन वर्षांत 30 मुले स्पर्धा परीक्षा पास झाले. या मुलांचे 80 टक्के आईवडील पत्र्यांच्या खोलीमध्ये राहतात. सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्यांना गरिबी नव्हती? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पथदिव्याखाली बसून शिक्षण घेतले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय संबंध आहे, शिक्षण आणि गरिबीचा. शिक्षण घेण्यासाठी वैचारिकता, जिद्द लागते. मी जे बोललो, त्याचा अर्थ चुकीचा काढण्यात आला. कोणाला खाली दाखवण्याचा उद्देश नव्हता. जे मला ट्रोल करत आहेत, त्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत. लोकसभेतील त्यांची भाषणे काढा. ते इंग्रजीमध्ये बोलतात. ती भाषणे इंग्रजीमध्ये का करतात. अमोल कोल्हे हिंदीत बोलतात. माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुमचे खासदार काय करतात ते पाहा, असा टोला खासदार सुजय विखेंनी दिला.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.