

Jalgaon Politics : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दीड वर्ष झालं. मात्र, तरीही अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. असे असताना आता जळगावच्या पालकमंत्रिपदावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्याला कारण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी नाशिक, रायगड आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आम्हाला राडगड, जळगाव, नाशिक देखील पाहीजे. किमान दोन ते तीन पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहीजे अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, पालकमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असही पाटील यांनी म्हटलं आहे.
सध्या जळगावचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहे. असे असताना आमदार अनिल पाटील यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा दावा सांगितल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पाटील यांनी अचानकपणे जळगावचे पालकमंत्री राष्ट्रवादीला पाहीजे असे म्हटल्याने हा गुलाबरावांसाठी अनपेक्षित धक्का आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख घटक पक्ष सत्तेत आहेत. सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री वाटप सुरुवातीलाच झाले आहे. मात्र, नाशिक व रायगडचे पालकमंत्रीपदावरुन वाद निर्माण झाल्याने दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रद्द करावे लागले होते.
नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं. मात्र, नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसेना, छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी नाराज झाली व त्यावरुन वाद झाला. रायगडमध्येही शिवसेनचे भरत गोगावले यांनी तटकरे यांच्या नावाला विरोध केला. परिणाम सरकारवर दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रद्द करण्याची नामुष्की ओढावली. तेव्हापासून -आतापर्यंत दोन्ही जिल्ह्याचा तिढा कायम आहे.
नाशिकमध्ये भुजबळांना पालकमंत्री करा असे फलक लागल्यानंतर पालकमंत्रीपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला. मात्र, नाशिक आणि रायगडमध्ये निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे. आता जळगावचाही मुद्दा पुढे आल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तिथेही शिवसेना-राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दरम्यान पाटील यांनी नाशिक, रायगड, जळगाव असे दोन ते तीन पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला पाहीजे अशी इच्छा व्यक्त केल्याने आता गुलाबराव पाटील यांची डोकेदुखी वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.