Malegaon Election News: महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला. प्रचार संपता संपता महायुतीतील पक्षाचे नेते एकमेकांचे वस्त्रहरण करीत राहिले. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी मोठा भाऊ भाजपचेच वस्त्रहरण केले.
राज्यात महायुती सत्तेत आहे. महापालिका निवडणुकीत मात्र काही ठिकाणी युती झाली नाही. या ठिकाणी परस्परांवर टीका करू नये असे संकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र स्थानिक राजकारण आडवे आल्याने नेते हे संकेत विसरले.
मालेगाव महापालिका निवडणुकीत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भाजपच्या उमेदवार आणि नेत्यांवर टीका करताना काहीच शिल्लक ठेवले नाही. भाजपचे उमेदवार आयात आहेत. दोन नंबरचे धंदे करतात. मटका, जुगार, गुंडगिरी, नकली नोटा हा त्यांचा धंदा असल्याचे भर सभेत सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांच्या ससेमिऱ्याला कंटाळलेल्या विरोधकांनी सरसकट भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे भुसे यांचे सर्व विरोधक सध्या भाजपमध्ये एकवटले आहेत. मालेगावच्या निवडणुकीत मंत्री भुसे यांना त्यांच्या परंपरागत विरोधकांनी सत्ताधारी पक्ष म्हणूनच आव्हान दिले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दादा भुसे यांनी आपल्या विरोधकांवरील हा संताप व्यक्त केला. या लोकांनी आपली मर्यादा ओळखावी. माझ्या विरोधात अपप्रचार केला तर, कार्यक्रम लावून टाकेल, असा इशाराच दिला.
ते म्हणाले, निवडणूक महापालिकेची आहे. विरोधक मात्र रेल्वे आणि अशा निरर्थक घोषणा करीत आहेत. जे रेल्वे आणू शकत होते त्यांना यांनी पराभूत केले. लोकसभा निवडणुकीत हे सर्व लोक कुठे होते?.
आमच्या विरोधात प्रचार करणारे पक्षाकडून पॅकेज घेऊन काम करतात. आताही त्यांना पॅकेज आलेले आहे. पॅकेजच्या वाटपावरून त्यांच्यातच वाद पेटला आहे. त्यावर आपण काही बोलण्याची गरज नाही.
विरोधकांनी नकली नोटा आणण्यासाठी भानगडी केल्या आहेत. पैसे देऊन जनता विकत घेता येते असा त्यांचा भ्रम आहे. जनता विकत घेता येत असती तर माझ्यासारखा नेता पाच वेळा निवडून आला असता का? असा प्रश्न त्यांनी केला.
प्रचाराच्या समारोपाला झालेल्या या सभेत मंत्री भुसे यांनी आपल्या सरकारचा घटक पक्ष असलेल्या भाजपला अक्षरशा दम भरला. विरोधकांनी जास्त गडबड केली तर कार्यक्रम लावून टाकू, शब्दात स्थानिक नेत्यांना इशारा दिला. त्यामुळे मालेगाव महापालिकेची निवडणूक महायुतीतील घटक पक्षांच्याच नेत्यांचे एकमेकांचे कपडे फाडण्यावरून रंगली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.