

Maharashtra municipal employees strike : राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि इतर प्रलंबित प्रश्नांनी आता गंभीर रूप धारण केले असून या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कामगार संघटना एकवटल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या पुढाकाराने शनिवारी (ता. 9) सकाळी 11 वाजता पुणे इथल्या श्रमिक भवन इथं राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीकडे राज्यातील हजारो महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर महापालिका कामगार (Worker) युनियनने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याबाबत, तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड उदय भट यांच्याकडे निवेदन देत तक्रार केली होती. यावर महासंघाने तातडीने राज्यभरातील महापालिका संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन करत ही बैठक बोलावली आहे. राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाढत्या असंतोषाला आता संघटित दिशा मिळत असून, पुण्यातील ही बैठक पुढील आंदोलनाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांना (Municipal) जीएसटी (एलबीटी) अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. फेब्रुवारी 2026चे अनुदान उशिरा मिळाले, तर मार्च 2026चे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अनेक महापालिकांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असून कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन वेळेवर देणे कठीण झाले आहे. परिणामी काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना तब्बल 2 ते 3 महिन्यांनी पगार दिला जात असून पेन्शनधारकांनाही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
काम करूनही वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि दैनंदिन गरजा भागवताना कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. या परिस्थितीत राज्यातील सर्व महानगरपालिका कामगार संघटनांनी एकत्र येऊन यावर ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक बनले आहे.
विशेषतः मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर करणे, शासनाकडून अनुदान वितरणाची प्रक्रिया गतीमान करणे, तसेच आवश्यक असल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील रणनीती आखली जाणार असून ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल व सचिव आनंद वायकर यांनी, “ही बैठक कामगारांच्या हक्कासाठी अत्यंत महत्त्वाची असून, राज्यातील सर्व संघटनांनी एकजुटीने सहभागी होणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून, त्यांच्या जगण्याशी संबंधित आहे. त्यामुळे यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.