

Nashik Collector News : काल नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर, वांझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे आणि मोहपाडा (चि.) या गावांमध्ये एकापाठोपाठ चार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरगाणा तालुक्यात भेट दिली.
या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून, जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणांकडून घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे थेट तेथील देवलदरी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महिला शेतक-यांसह भाताची लावणीही केली. त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणाची पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
यावेळी, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, सुरगाणा तालुक्यातील नागरिक कष्टाळू आहेत. या तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत प्रशासन प्रभावीपणे काम करीत आहे. ते विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. कठीण भौगोलिक परिस्थिती, दुर्गम भाग आणि विविध आव्हानांचा सामना करत अधिकारी व कर्मचारी समर्पित भावनेने कार्यरत आहेत. त्यांचे अथक परिश्रम, समन्वय आणि कर्तव्यनिष्ठेमुळे शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असून प्रशासनाची कार्यक्षमता अधिक बळकट होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही लोकाभिमुख सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण सुरगाणा तालुका प्रशासनाचे यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कौतुक केलं.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या दौऱ्यात सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा ज्ञानदेव तिखे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना घाबरुन न जाण्याचे आवाहन
दरम्यान प्रशासनाने येथील भूकंपाच्या हादऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर असत्यापित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) पूर्ण क्षमतेने कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२५३-२३१४१८१ उपलब्ध आहेत.
भूकंपमापन यंत्रणा (MERI, नाशिक) व संबंधित तज्ज्ञांकडून सद्यस्थितीचे सातत्याने विश्लेषण करण्यात येत असून, पुढील अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.