

Nashik Politics : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून त्यानिमित्ताने शहरात हजारो कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. कुंभमेळा म्हटलं की, राजकारणी आणि विकासकांकडून विविध सोयीची कामे सुचवली जातात त्यातली काही कामे प्रत्यक्षात केली देखील जातात. नाशिक शहरातही अशाच एका रस्त्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. गंगापूर रोडवरील वाहतूक कमी करण्यासाठी त्याला समांतर रस्ता करण्यात यावा, यासाठी मंत्री, आमदार आणि महापौरांकडून प्रयत्न सुरू आहेत.
नुकतीच मुंबईत विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडली. याच बैठकीत नाशिकच्या लोकप्रतिनिधीने रस्त्याचा मुद्दा मांडला. मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांनी लग्नात बारसे उरकण्याचे प्रकार करू नका, अशा शब्दात खडसावलं. त्यामुळे आता कुंभमेळ्याच्या कामांमध्ये तरी गंगापूररोडला समांतर रस्त्याचे काम होणार नाही असे दिसतय. कारण मुख्यमंत्र्यांनीच त्यावर फुली मारली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी येत असतो. सिंहस्थाच्या निमित्ताने या निधीतून आपल्या मतदारसंघातील कामे करुन घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो. ज्याला आपण वाहत्या गंगेत हात धुवून घेणे असेही म्हणू शकतो. नाशिकमध्ये यापूर्वीही सिंहस्थाच्या काळात असे अनेक रस्ते आणि पूल उभारले गेले आहेत, याची नाशिककरांना चांगली माहिती आहे.
नाशिकमधील गंगापूर रोड हा शहरातील उच्चभ्रू भागातील महत्त्वाचा रस्ता मानला जातो. वाढत्या वाहतुकीमुळे हा रस्ता अपुरा पडत असल्याने त्यावरील ताण कमी करण्यासाठी गोदावरीच्या पलिकडून त्याला समांतर रस्ता उभारण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकोटे यांनी यासंदर्भात सर्वप्रथम नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी गंगापूर रोडला समांतर रस्ता तसेच नाशिकरोड ते सिन्नर या मार्गाला समांतर रस्ता सिंहस्थाच्या कामांमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय रस्ते निधीतून नाशिकरोड–सिन्नर मार्गाला समांतर रस्ता मंजूर झाल्याची माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. त्यामुळे त्या रस्त्याचे काम मार्गी लागले. मात्र, गंगापूर रोडला समांतर रस्त्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबितच राहिला.
दरम्यान नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनीही काही दिवसांपूर्वी गंगापूर रोडला समांतर रस्ता व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीवरही कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही.
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक झाली. या बैठकीला शहरातील आमदार, मंत्री, महापौर सारेच उपस्थितीत होते. प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांपासून महापालिका आयुक्तांपर्यंत अनेक महत्वाचे अधिकारी उपस्थितीत होते. याच बैठकीत भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही कामांचा समावेश सिंहस्थाच्या आराखड्यात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच गंगापूररोडला समांतर रस्ता करणे किती आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
गोदावरी नदीच्या पलिकडील भागात आतापर्यंत किती बांधकाम झाले आहे आणि पुढील काळात त्यात किती वाढ होऊ शकते, याचीही माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. त्यांनी या संदर्भात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना संबंधित रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली. त्यावर सिंहस्थासाठी कोणती आणि किती कामे करायची याच्या स्पष्ट सीमारेषा ठरवण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यातून मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा योग्य अर्थ लक्षात घेतला.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थासाठी कामे सुचवताना थेटपणे ‘लग्नात बारसे उरकण्याचे प्रकार करू नका’, असा स्पष्ट इशाराच दिला. फडणवीसांनी या भाषेत खडसावल्याने परिणामी गंगापूर रोडला समांतर रस्त्याच्या विषयावरच पडदा पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.