

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्या. शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला मोठं अपयश आलं. पालिका निवडणुकीत 'पानिपत' झाल्याचे पाहाता आता पुढे होणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याचे संकेत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र त्यातला एकही उमेदवारी निवडून येऊ शकला नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात सात आमदार असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पालिका निवडणुकीत ४२ जागा लढवल्या. मात्र केवळ चारच नगरसेवक निवडून आले.
नाशिकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. १२२ पैकी तब्बल ७२ जागा स्वबळावर एकट्या भाजपने जिंकल्या. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला २६ जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना उबाठाला १५ जागांवर उमेदवार निवडून आणता आले. कॉंग्रेस ३, मनसे १ व अपक्ष १ अशी नाशिकची स्थिती राहिली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी सापत्न वागणूक मिळत असल्याचे सांगत तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटात सात आमदार आणि तीन मंत्री असतानाही पक्षाची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. तेही शिवसेनेसोबत युती असताना. मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारात सहभागी होऊ शकले नाही तोही फटका बसला. महापालिका निवडणुकीत इतकं मोठं अपयश आल्यावर या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ नाशिकच नव्हे तर १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक एकत्र लढण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. किमान महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तरी आपली ताकद कायम राहील, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात भाजपला रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ला एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाही. किंबहुना, महाविकास आघाडीनेही एकत्रित लढले पाहिजे, तरच भाजपचा पराभव होईल. नाशिक जिल्ह्यात आम्ही तसा प्रयत्न करू असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.