

Nashik Politics : नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या १२२ नगरसेवकांमधील १६ सदस्य हे मनपाची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर गेले आहेत. सभागृहातील संख्या बळानुसार भाजपचे सर्वाधिक ९, शिवसेना व मनसे यांच्या गटाचे ४, शिवसेना उबाठा व कॉंग्रेस यांच्या गटाचे २ व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका सदस्याची स्थायीवर बिनविरोध निवड झाली आहे.
स्थायी समिती निवडीसाठी (ता. १६) महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा बोलाविण्यात आली होती. या सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेत स्थायी समितीचे सदस्य पद हे मलईदार समजले जाते. त्यामुळे स्थायीवर जाण्याची संधी मिळावी यासाठी नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न दिसले. त्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावली गेली.
नाशिकमध्ये भाजपला ७२ जागा मिळाल्या आहेत. तर त्या खालोखाल शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (उबाठा) चे १५, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर एक अपक्ष मुकेश शहाणे निवडून आले आहेत. तर मनसेच्या मयुरी अंकुश पवार या एकमेव निवडून आल्या आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करताना शिवसेना (शिंदे गटासोबत) नोंदणी केली. मनसेने शिवसेनेसोबत गटनोंदणी केल्याने शिवसेनेचा गुणांक वाढला. त्याचा परिणाम म्हणून भाजपची स्थायी समितीची एक जागा कमी झाली. जिथे स्थायीवर भाजपचे दहा सदस्य जाणार होते तिथे आता ९ सदस्य जाणार आहेत. आता याची बक्षिसी म्हणून शिवसेना (शिंदे गटाकडून) मनसेच्या मयुरी पवार यांना स्थायी समितीच्या सदस्य म्हणून संधी दिली गेली आहे. मनसेच्या मयुरी पवार यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेसह गटनोंदणी केल्यामुळे त्यांची पहिल्याच टप्प्यात स्थायी समितीवर वर्णी लागली. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला नवे वळण मिळाले आहे.
तर अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) गटनोंदणी केली होती. त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची नोंदणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत झाली.नगरसेवकांची संख्या लक्षात घेता भाजपचे दहा, शिवसेनेचे तीन, ठाकरे सेनेचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य स्थायीवर जाईल हे निश्चित होतं.
मात्र शिवसेनेत मनसेने गटनोंदणी केल्याने गुणांकन वाढले व भाजपच्या एका सदस्याची संख्या कमी झाली. त्यामुळे आता भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, ठाकरे सेनेचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक याप्रमाणे सदस्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात मनसेच्या मयुरी पवार यांची लॉटरी लागली असून त्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेला फायदेशीर झाला. शिवसेना-मनसेचा एक सदस्य स्थायीवर वाढला. शिवसेनेने मनसेच्या मयुरी पवार यांचे नाव स्थायी समितीवर सदस्य म्हणून निश्चित केले आहे.
सोळा सदस्यीय स्थायी समितीत सभापती पदासाठी ९ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. भाजपचे नऊ सदस्य स्थायीवर जात असल्याने त्यांचा सभापती बसेल हे जवळपास निश्चित आहे. शिवाय भाजपने शिवसेना शिंदे गटाला उपमहापौर देत सत्तेत सहभागी करून घेतल्याने विरोधकांकडे बहुमत नाही. त्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.