

Kumbh Mela News: नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आज नाशिकमध्ये पाहायला मिळाले. कुंभमेळा हा धार्मिक आस्थेचा विषय असून यात एकाच पक्षाची ढवळाढवळ होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही खासदार राजाभाऊ वाजे यांना योग्य सन्मान मिळाला नसल्याचा दावा करत ठाकरेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला आहे. ध्वजारोहण सोहळ्यातही वाजे यांना योग्य सन्मान मिळाला नसल्याचा दावा करत ठाकरेसेनेने निदर्शन केले.
पुरोहित संघाचे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी(ता. ३१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. झाला. या कार्यक्रमाचे नियोजन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. यावेळी भाजपला झुकते माप देण्यात आल्याचे सांगत ठाकरेसेनेचे कार्यकर्ते संतापले आहेत.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप ठाकरेसेनेने केला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमातही त्यांना अपेक्षित सन्मान मिळाला नाही. हा केवळ खासदारांचा नव्हे, तर नाशिकच्या जनतेचाही अपमान असल्याची भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.
या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
‘सिंहस्थ कुंभमेळा भाजपचा कार्यक्रम आहे का?’
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या जनतेचा आणि भाविकांचा उत्सव आहे. त्यासाठी जनतेच्या करातून निधी खर्च केला जात आहे. मात्र हा कार्यक्रम भाजपचा असल्यासारखी स्थिती आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात असताना विकासकामांचे नियोजन, निधीचा विनियोग आणि खर्चाबाबत पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडली जात नसल्याचा आरोपही ठाकरेसेनेने केला. हजारो कोटी रुपये नेमके कुठे खर्च होत आहेत, याचा हिशेब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली.
शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.०२) निदर्शने करण्यात आली. कुंभमेळा हा जनतेचा आहे. 50 कोटी रुपये लाच न स्वीकारता स्वाभिमानाने काम करणाऱ्या राजाभाऊ वाजे हे कोणापुढेही झुकले नाही. त्याचा बदला कुंभमेळ्यात दुय्यम वागणूक देत भाजप करीत आहे. याबाबत प्रशासनाने माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. कुंभमेळा मंत्री आणि सिंहस्थ कुंभमेळा प्रशासनाने सर्व विकास कामांचा हिशोब द्यावा. हजारो कोटी रुपये कुठे खर्च होत आहे हे जनतेपुढे मांडावे. यासंदर्भात होणारा संशय आणि भ्रष्टाचार या विरोधात शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.