

Imtiyaz Jaleel Gets Bail in Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैगिंक छळाच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या एमआयएम नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
TCS प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान फरार असताना तिला संभाजीनगर येथे आश्रय दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावर आहे. याच कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. नाशिक एसआयटीच्या पथकाने त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती.
दरम्यान गुरुवार (दि. १९ ) नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. जलील हे स्वत:सुनावणीवेळी उपस्थितीत होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जलील यांच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांचा जामीन अर्ज मंजूर केला. इम्तियाज जलील यांच्यावर लावण्यात आलेली कलमे जामीनास पात्र असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना जामीन दिला.
इम्तियाज जलील आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर नाशिक न्यायालयात सुनावणी पार पडली.
यासंदर्भात सरकारी वकील विजय गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणात निदा खानवर गुन्हा दाखल असतानाही इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेत ती निर्दोष असल्याचे म्हटले होते. मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरुन तब्बल ४० दिवस निदा खानला लपवून तिला आश्रय दिला. तिला कशा प्रकारे लपवले गेले, याचे रेकॉर्डिंगही आम्ही न्यायालयासमोर सादर केले होते. मात्र, या गुन्ह्याचा तपास आता पूर्ण झालेला असल्याने आणि इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मिळालेला असल्याच्या कारणावरून न्यायालयाने जलील यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान २ महिने पोलिसांना गुंगारा देत पसार होती. तिला छत्रपती संभाजीनगर येथे विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा उलगडा एसआयटी पथकाच्या तपासात झाला होता.
निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी एमआयएमचे नगरसेवक संशयित मतीन पटेल आणि माजी खासदार संशयित इम्तियाज जलील यांच्यात झालेला संवाद पोलिसांच्या हाती लागला होता. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले पुराव्यांवरुन पोलिसांनी जलील यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट केले. जलील यांना निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात सहआरोपी करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.