Loksabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीने येथून भास्कर राव भगरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या डॉ. पवार यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मतदार गाठीभेटींवर भर दिला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार आमदार आहेत. यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (येवला), दिलीप बनकर (निफाड), नितीन पवार (कळवण), आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (दिंडोरी) यांचा समावेश आहे. याशिनवाय शिवसेना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे सुहास कांदे (नांदगाव), आणि भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर राहुल आहेर (चांदवड) असे सर्व सहा महायुतीचे आमदार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार(Bharti Pawar) यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारी जाहीर होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, महायुतीच्या घटक पक्षांमध्ये फारसा समन्वय प्रस्थापित झालेला नाही, अशी चर्चा आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रचारामध्ये दिसून आलेले नाहीत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
दिंडोरी येथील नरहरी झिरवाळ नाराज असल्याच्या चर्चादेखील आहेत. या पार्श्वभूमीवर झिरवाळ प्रचारात दिसलेले नाहीत, तर येत्या एक-दोन दिवसांत झिरवाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव हेदेखील इच्छुक उमेदवार होते. त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश आले नाही. अशीच स्थिती लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघातदेखील आहे. आमदार महायुतीचे असले तरी पक्षांतर्गत व अन्य विषयांमुळे हे आमदार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांतील समन्वयाच्या प्रयत्नांना अडथळे निर्माण होत असल्याचे बोलले जाते.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात(Dindori Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घटक पक्षांच्या समन्वयावर भर दिला आहे. त्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. महायुतीच्या नेत्यांनीदेखील विधानसभा मतदारसंघनिहाय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला आहे. मतदारांची संपर्क मोहीम सुरू केलेली आहे. त्यात सर्व आमदार किंवा सहभागी होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचा प्रचार वेगळ्याच कारणाने गाजण्याची चिन्हे आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.