Nashik, 07 April : धुळे लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. आता काँग्रेसच्या इच्छुकांनी बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष उमेदवारीबाबत गोंधळलेला दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी एक नवा पर्याय सुचविला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाला सोडला आहे. या पक्षाकडे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे दोघे इच्छुक आहेत. त्यामध्ये आता नाशिकच्या माजी महापौर व माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव यांची भर पडली आहे. अद्यापही प्रबळ उमेदवार नसल्याने काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी संभ्रमित आहे. त्यातच आता डॉ. शेवाळे यांनी पक्षाने मतदार संघातील उमेदवारच द्यावा, बाहेरचा उमेदवार देऊ नये. त्याला प्रतिसाद मिळणार नाही, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मत मतांतरे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धुळे मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. भामरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार कोण, हे अद्याप ठरत नाही. त्यामुळे यात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Sharadchandra Pawar) काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी एक नवा पर्याय सुचविला आहे. या पर्यायानुसार मालेगाव शहरातील ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांचा पर्याय दिला आहे. या वर गांभीर्याने चर्चा झाल्यास महाविकास आघाडीला एक प्रभावी उमेदवार मिळू शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख तसेच धुळ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन धुळे मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात शरद पवार यांना याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे. रमजानचे उपवास संपल्यानंतर हे शिष्टमंडळ शरद पवार यांची भेट घेणार आहे. धुळे मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अथवा काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करण्याची या पदाधिकाऱ्यांनी तयारी दाखविली आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यास धुळे मतदार संघातील राजकारणाला गती येऊ शकेल.
धुळे मतदार संघात भाजपचे डॉ. भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून ही उमेदवारी बदलण्यासाठी पक्षाध्यक्षांना मेल करण्यात आले आहेत. समाज माध्यमांवर देखील तशा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण भारतीय जनता पक्षाला अनुकूल नाही. कांदा निर्यातबंदीचा या मतदार संघावर प्रभाव आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने प्रभावी उमेदवार दिल्यास यंदाच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत होऊ शकते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.