Jalgaon : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्री झाल्यावर प्रथमच त्यांना पालकमंत्रिपद मिळाले आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले व प्रथमच आमदार झाले.
जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकमेव विधानसभा जिंकता आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकमेव आमदार होते. अजिदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तेही त्यांच्यासोबत पक्ष सोडून बाहेर पडले आहेत. त्यांना राज्यांचे मदत व पुनर्वसन हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. प्रथमच आमदार आणि मंत्रिपद असा लाभ त्यांना झाला. त्यांना पालकमंत्रिपद कुठले मिळणार याची प्रतीक्षा होती.
स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला त्यांनी बुलडाणा येथे झेंडावंदन केले होते. त्यामुळे त्यांना बुलडाणा येथील पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा त्यांच्या अमळनेर मतदारसंघाच्या जवळ असल्याने त्यांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे. त्यांना काम करणेही सुलभ होणार आहे. शिवाय नंदुरबार येथे पालकमंत्री म्हणून केलेले काम त्यांच्या अमळनेर मतदारसंघातील जनतेलाही दिसणार आहे. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काम करण्याचे मोठे आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.