

Ahilyanagar crime news : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गँगरेपची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप होत असून, संतप्त पीडितेने थेट पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर स्वतःसह मुलाच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, पीडितेसोबत आलेल्या व्यक्तीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव) असे आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पाथर्डी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पीडित महिला, तिचा मुलगा आणि विठ्ठल खर्चन हे पाथर्डी पोलिस ठाण्यात गँगरेपची (Rape Case) तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्याऐवजी तिच्यावर अविश्वास दाखवत तिला परत जाण्याच्या सूचना केल्याचा आरोप आहे. यामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने संतप्त होत थेट पोलिस ठाण्यासमोर स्वतःसह मुलाच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
पोलिस (Police) ठाण्यात सुरू झालेल्या गोंधळादरम्यान पीडितेसोबत आलेले विठ्ठल खर्चन अचानक जमिनीवर कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ते बराच वेळ तसेच पडून होते. नंतर ते हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूची माहिती समजताच पीडिता आणि नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी थेट पोलिसांवर निष्काळजीपणाचे आणि दबावाखाली काम केल्याचे गंभीर आरोप केले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह एका लोकप्रतिनिधीवरही पीडितेकडून आरोप करण्यात आले आहेत.
या सर्व गोंधळात पीडित महिला देखील बेशुद्ध पडली होती. उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पाथर्डी पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून तब्बल 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, दोघांनी तिच्यावर अत्याचार केला असून इतरांनी त्यांना मदत केली. तसेच घर बांधकामासाठी ठेवलेले तीन लाख रुपये चोरी केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दिनकर गंगाधर किलबिले, प्रभाकर सुधाकर किलबिले, कृष्णा सुधाकर किलबिले, सारंगधर उत्तम किलबिले, अमोल मच्छिंद्र कोठे, निखिल माने, जयदत्त उत्तम किलबिले, अभिषेक दिलीप किलबिले, दिलीप तुकाराम किलबिले, भीमराव ज्ञानदेव किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, सुभाष गोविंद किलबिले, आनंद भाऊसाहेब कासूळे, मनीषा सुधाकर किलबिले आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेची तक्रार सुरुवातीलाच का घेतली गेली नाही? आत्महत्येचा प्रयत्न करण्याइतकी वेळ पीडितेवर का आली? पोलिसांवर राजकीय दबाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पीडितेसाठी धाव घेतलेल्या विविध संघटनांनी पाथर्डी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एका गँगरेप प्रकरणाने थेट पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू आणि अखेर 16 जणांवर गुन्हा अशा नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.