Pimpalgaon Bazar Samiti : आमदार गोकुळ गिते, अनिल कदमांनी सभापती दिलीप बनकरांना घेरलं ; वार्षिक सभेत 4 तास खडाजंगी

Pimpalgaon APMC Annual Meeting : तब्बल चार तास चाललेल्या पिंपळगाव बाजारसमितीच्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सभापती दिलीप बनकरांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Pimpalgaon APMC Annual Meeting, Gokul Gite, Anil Kadam news
Pimpalgaon APMC Annual Meeting, Gokul Gite, Anil Kadam newsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpalgaon APMC Annual Meeting : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २६) पार पडली. तब्बल चार तास चाललेली ही सभा चांगलीच वादळी ठरली. सभेत विविध विषयांवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

विशेषत: समितीचे संचालक, आमदार गोकुळ गिते व अनिल कदम यांनी सभापती दिलीप बनकरांना घेरल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकास्रांना सभापती बनकरांनी तितकेच चोख प्रत्युत्तर दिले.

बाजार समितीच्या कामकाजातील पारदर्शकता, उपबाजार आवारांचा विकास, टोमॅटोच्या बाजारभावातील तफावत, बांधकामांची बिले आणि कर्मचारी भरतीसह विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

त्यावर बाजार समिती कोणालाही पाठीशी घालत नसून शेतकरी हितालाच प्राधान्य असल्याचे सभापती तथा आमदार दिलीप बनकरांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. संबंधित तक्रारीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Pimpalgaon APMC Annual Meeting, Gokul Gite, Anil Kadam news
Girish Mahajan : दुष्काळ जाहीर झाला, श्रेयवाद पेटला; शरद पवारांवर महाजनांचं मौन, शशिकांत शिंदेंवर निशाणा

यावेळी, विधान परिषदेचे आमदार तथा बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते यांनी बाजार समितीच्या वार्षिक अहवालात संस्थेसाठी योगदान देणाऱ्यांचे फोटो वगळल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. अहवालातील त्रुटी दुरुस्थ करुन अहवाल सादर करण्याची मागणी केली.

तसेच बांधकाम सभापतींची परवानगी न घेता बिले अदा केली जात असल्याचा आरोप करत मापाऱ्यांना किमान १८ हजार रुपये वेतन देण्याची मागणी गोकुळ गिते यांनी केली. नवीन सचिवाची भरती प्रलंबित असल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. संचालकांना बाजार समितीच्या कामकाजात अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Pimpalgaon APMC Annual Meeting, Gokul Gite, Anil Kadam news
Pimpalgaon Bazar Samiti : आमदार दिलीप बनकरांच्या सत्तेला खरंच सुरुंग? टोकनचा तिढा अन् सहा संचालकांची खेळी; जाणून घ्या इनसाइड स्टोरी...

तसेच माजी आमदार अनिल कदम यांनी बाजार समितीचा कारभार केवळ पिंपळगावपुरता मर्यादित राहिल्याचा आरोप करत इतर बाजार आवारांकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. काही तासांच्या अंतराने टॉमेटो भावात होणाऱ्या बदलांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले.

संचालक अमृता पवार यांनी पणन मंडळाच्या नियमांनुसार बाजार समितीचे कामकाज होत नसल्याचा आरोप केला. पणन मंडळाचे नियम धाब्यावर बसवून आर्किटेक्टची नियुक्ती केल्याचा आणि ठेकेदारांना ज्यादा रकमा दिल्याचा आरोप केला.

यावेळी विविध आरोपांना उत्तर देताना सभापती दिलीप बनकर यांनी बाजार समितीचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला. रानवड उपबाजार सुरू करण्यासंदर्भात ग्रामसभेचे पत्र प्राप्त होताच ठराव करून बाजार सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. टोमॅटोच्या दराबाबत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. प्राप्त तक्रारीची दखल घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल, असे बनकर यांनी स्पष्ट केले.

तसेच औरंगपूर-भुसे-भेंडाळी बाजार आवार दिवाळीनंतर लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अनुकंपा तत्त्वावरील भरतीसंदर्भात बाजार समितीकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून पात्र व्यक्तींना कामावर घेण्यात आल्याचे सांगत भरती नियमानुसार केल्याचे स्पष्ट केले.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com