

PM Awas Yojana Bribery Case : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामासाठीचा पुढील अनुदान हप्ता मंजूर करून देण्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असून ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिकासह तीन लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ग्रामपंचायत सात्रळ (ता. राहुरी) येथील ग्रामविकास अधिकारी हैदर याकुब पटेल, कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे आणि पंचायत समिती राहुरी (Rahuri) येथील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन हौशीराम ब्राम्हणे यांच्यावर कारवाई करण्यात आली. या तिघांविरोधात राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. सन 2023 मध्ये त्यांचे घरकुल मंजूर झाले होते. या योजनेअंतर्गत त्यांना बांधकामासाठी पहिला 15 हजार रुपयांचा आणि दुसरा 70 हजार रुपयांचा हप्ता यापूर्वीच मिळाला होता. मात्र पुढील अनुदान हप्ता (Corruption) मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अडथळे निर्माण करण्यात येत होते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पुढील हप्ता मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने ग्रामविकास अधिकारी पटेल आणि अभियंता ब्राम्हणे यांच्यावतीने 20 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत 29 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी करताना 30 जून रोजी तक्रारदाराने आरोपी पटेल आणि डुकरे यांची भेट घेतली. त्यावेळी अनुदान मंजुरीच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची मागणी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी ज्ञानदेव डुकरे याने तक्रारदाराकडून प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. तर अभियंता सचिन ब्राम्हणे यांनी ही रक्कम स्वीकारण्यासाठी डुकरे याला प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले.
ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस निरीक्षक सविता तांबे यांच्या पथकाने केली. प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या सर्वसामान्यांसाठीच्या योजनांमध्येही भ्रष्टाचाराचे प्रकार उघड होत असल्याने प्रशासनातील कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.