Ahilyanagar Municipal Corporation : युतीत सत्तेचा तुकडा… 26 खुश, 26 नाराज; आतून बंडाची चाहूल? विखे-जगतापांची मनधरणीची खरी कसोटी!

Vikhe–Jagtap Power Deal: 26 Corporators to Get Posts in Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत भाजप-अजित पवार राष्ट्रवादीने सत्तेचा सव्वा-सव्वा वर्षांचा फाॅर्म्युला डोकेदुखी वाढवणारा ठरणार असे संकेत आहे.
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Mahapalika politics : अहिल्यानगर जिल्हा सहकाराच्या राजकारणासाठी ओळखला जातो. हेच सहकाराचं राजकारण आता अहिल्यानगर महापालिकेतही येऊ घातलं आहे. आपण सारे भाऊ...सत्ता वाटून घेऊ.., असे महापालिकेच्या सत्तेत रूजू पाहत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेत स्वीकारलेला सव्वा-सव्वा वर्षाचा फॉर्म्युला अहिल्यानगरमध्येही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपने स्वीकारला आहे.

या फाॅर्म्युल्यानुसार युतीतील 52 नगरसेवकांपैकी, पुढील पाच वर्षात तब्बल 26 जणांना महापालिकेत प्रमुख पदे मिळणार आहेत. पण त्याचवेळी दुसरीकडे एवढेच म्हणजे सत्ताधार्‍यांतीलच 26जण नाराजही होणार आहेत. पदावर कोणाला संधी मिळणार अन् कोणाची हुकणार, याची चर्चा आताच रंगू लागली आहे. नाराजींची मनधरणी करण्यात विखे-जगताप यांचा कस लागणार हे देखील बोलले जात आहे.

महापालिकेच्या दहाव्या महापौर म्हणून अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे व उपमहापौर म्हणून भाजपच्या धनंजय जाधव यांची निवड येत्या शुक्रवारी (6 फेब्रुवारी) होणार्‍या नगरसेवकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. या दोघांविरुद्ध कोणीही अर्ज भरला नसल्याने आता फक्त बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

या पार्श्वभूमीवर, या दोन्ही पदांचे उमेदवार जाहीर करताना भाजपचे (BJP) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे प्रत्येकी फक्त सव्वा-सव्वा वर्षाची असतील असे स्पष्ट करताना मनपातील अन्य पदांबाबतही असाच निकष लावण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे यंदाच्या पाच वर्षात मनपात अनेकांना सत्तापदे मिळतील, असे दिसू लागले आहे. पण त्याचवेळी अनेकजण नाराजही होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे त्रिकुट काय तोडगा काढते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Ahilyanagar Municipal Corporation
Karjat municipality controversy : अपमान की सुडाचे राजकारण? अजितदादांचे फलक हटवताच, राम शिंदेंविरोधात आगडोंब, ‘कर्जत बीड नाही’ असा इशारा

सत्ता चाखण्याचा फळ समजून घ्या...

मनपातील सत्ता वाटप, युतीत दर सव्वा-सव्वा वर्षाला फिरवण्याचे धोरण स्वीकारल्यास, पुढील पाच वर्षात चार महापौर व चार उपमहापौर होतील. राष्ट्रवादी-भाजपच्या सत्ता वाटप सूत्रानुसार पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीचा महापौर व भाजपचा उपमहापौर असेल. त्यामुळे ज्योती गाडे यांची महापौरपदाची सव्वा वर्षाची मुदत मे 27मध्ये संपल्यावर त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्याच दुसर्‍या महिलेची पुढच्या सव्वा वर्षासाठी निवड होईल. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षात महापौर पदाचे कोणते आरक्षण पडते हे पाहून त्यावेळी भाजपचा महापौर सव्वा वर्षासाठी व राष्ट्रवादीचा उपमहापौर सव्वा वर्षासाठी असेल. त्यांची मुदत संपल्यावर पुढच्या सव्वा वर्षासाठी अशाच पद्धतीने या दोन्ही पक्षांचे महापौर व उपमहापौर होतील. सव्वा वषाच्या निकषानुसार पाच वर्षात चार महापौर व चार उपमहापौर मनपाला मिळणार आहेत.

Ahilyanagar Municipal Corporation
Beed Walmik Karad Supporter Call : "जरांगेंना संपवू" कटाचा आवाज बाहेर! कराड समर्थकाचं कॉल रेकॉर्डिंग लिक; राज्यात राजकीय भूकंप (Video)

सभापती ते सभागृह नेतेपद

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची मुदत फक्त एक वर्षाची असते. त्यामुळे पाच वर्षात स्थायीचे पाच सभापती होणार आहेत. महिला व बालकल्याण समितीचे सभापती व उपसभापति, अशा दोन पदांनाही सव्वा-सव्वा वर्षाची मुदत केली गेल्याने पाच वर्षात या समितीला चार सभापती व चार उपसभापती मिळतील. तर सभागृह नेतेपदही एक वर्षासाठी केले गेल्यास या पदावर पाच वर्षात पाचजणांना संधी मिळेल. या सार्‍या हिशेबाने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती व सभागृह नेता या सत्ताधार्‍यांकडे असलेल्या सहा प्रमुख पदांवर तब्बल 26जणांना संधी मिळणार आहे.

सत्ता वाटपाचं दिव्य असणार

मात्र, यातून सत्ताधारी राष्ट्रवादी (27) व भाजपचे (25) एकत्रित संख्याबळ 52 नगरसेवकांचे आहे. त्यातील निम्म्या लोकांना सत्तेची संधी मिळेल व निम्मे लोक पदाविना राहतील. अर्थात, या निम्म्या लोकांमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले जास्त असतील. त्यांची वर्णी विषय समित्यांच्या सदस्य पदांतून होऊ शकते. या सदस्यपदांतून काही ना काही फायदा मिळणार असल्याने त्यांची नाराजीही काहीअंशी दूर होऊ शकते.

शिंदेसेना फॉर्म्युला स्वीकारणार?

महापालिकेत सर्वात मोठा विरोधी पक्ष एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आहे. त्यांचे दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे मनपाचे विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडे येणार आहे. त्यांनीही त्यांच्या नेत्याने ठाण्यात राबवलेला व अहिल्यानगरच्या सत्ताधार्‍यांनी स्वीकारलेला फॉर्म्युला अंगीकारला तर, त्यांच्याकडेही सव्वा-सव्वा वर्षासाठी विरोधी पक्ष नेता होऊ शकतो व त्यांच्याकडूनही चार जणांना या पदावर संधी मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com