

Jalgaon News : रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या दुर्दैवी प्रसूती प्रकरणाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) मिनल करनवाल यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कंत्राटी आरोग्य सेविकेला सेवेतून कमी केलं आहे. या कारवाईने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गारखेडा येथील रुकसान अजित तडवी यांना १० मार्च रोजी मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आशासेविकेने त्यांना गारखेडा आरोग्य उपकेंद्रात दाखल केले व कंत्राटी आरोग्यसेविकेला फोनवर या घटनेची माहिती दिली. मात्र, कंत्राटी आरोग्य सेविका असलेल्या नंदा पाटील मुख्यालयी राहत नसल्याने त्या वेळेत उपकेंद्रात उपस्थित राहू शकल्या नाहीत.
गरोदर महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने आशासेविकेने स्वतःकडे असलेल्या प्रशिक्षणाचा वापर करून उपकेंद्रातील साधनसामग्रीच्या मदतीने प्रसूती केली. रात्री एकच्या सुमारास ही प्रसुती केली. परंतु प्रसूतीनंतर नवजात बाळ रडत नसल्याचे लक्षात येताच आई व बाळाला पाल ग्रामीण रुग्णालयात हलविले. पाल ग्रामीण रुग्णालयात बाळावर प्राथमिक उपचार केले. नंतर सावदा येथे हलविले. मात्र दुर्दैवाने सावदा येथे पोहोचण्यापूर्वीच नवजात बाळाचा रस्त्यातच मृत्यू झाला.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे या घटनेची जिल्हा परिषद प्रशासनाने सखोल चौकशी केली. प्राथमिक चौकशीत आरोग्य सेविका मुख्यालयी नसल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाप्रशासनाने याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. दरम्यान ही घटना अत्यंत गंभीर असून यापुढे अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. शिवाय मुख्यालयी राहण्याचे कर्मचाऱ्यांना सक्तीचे केले.
दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व तत्पर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.