

Nashik Politics : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात गुरुवारी पर्यावरणप्रेमींनी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात मनसेचे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. महापालिकेत मनसेची सत्ता असताना एकही झाड न तोडता कुंभमेळा घेतला होता, मग आताच वृक्षतोड करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी नाशिकच्या महापौर हिमगौरी-आहेर आडके यांना विचारला.
अमित ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमींसह महापालिकेत पोहचले. त्यांना महापालिका आयुक्तांची भेट घ्यायची होती. परंतु भेट होऊ शकली नाही. अखेरीस त्यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनपा आयुक्त का भेटल्या नाहीत, ते माहिती नसल्याचे सांगत त्यांनी हे तर निवडणूक आयोगाच्या कारभारासारखे असल्याची टीका केली.
अमित ठाकरेंनी नमूद केलं की, याआधी पर्यावरणप्रेमींनी आयुक्तांची भेट घेतली होती, त्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नावर आज आपण मनपा आयुक्तांना भेटायला आलो होतो. मात्र, आयुक्त का भेटल्या नाहीत, ते माहिती नाही. हे तर निवडणूक आयोगासारखे झाले. राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटल्यावर तो केंद्रीय निवडणूक आयोग उत्तर देणे लागतो असे सांगतो, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आल्यावर तो राज्याचे अधिकारी उत्तर देणे लागतो असे सांगतो. अशाच प्रकारे नाशिक महापालिकेत ढकलाढकली सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आयुक्त महापौर आणि आमदारही त्यांचेच असून यापैकी कोणीही उत्तर द्यावे, परंतु, तोपर्यंत एकही झाड कापले गेले नाही पाहिजे असा इशारा अमित ठाकरेंनी दिला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तपोवन वृक्षतोड विरोधातील चळवळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. त्यानंतर आता मनसेचे अमित ठाकरे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. पर्यावरणप्रेमींच्या वतीने हुतात्मा स्मारक ते महापालिका काढण्यात आलेल्या पायी मोर्चात त्यांनी सहभाग घेतला. महापौरांची भेट घेत प्रशासनाने वृक्षतोडीचा हट्ट सोडावा शहराच्या भविष्याचा विचार करावा व वृक्षतोड थांबवावी असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दहा ते बारा पर्यावरणप्रेमींचा सहभाग असलेली समिती स्थापन करण्याचा पर्याय सुचवला. या समितीत आपणही सहभागी होणार असल्याचे अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता समन्वय समितीच्या माध्यमातून पुढील बैठका होणार आहेत अशी माहिती पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.