Pathardi News : पाथर्डीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकप्रतिनिधींना हप्ता न दिल्याने काही तरुणांनी रस्त्याचे काम बंद पाडले आहे. हप्ता मागणाऱ्या तरुणांनी लोकप्रतिनिधीचे नाव न घेतल्याने याप्रकारात वेगवेगळ्यांची नावे घेऊन आता पाथर्डी शहरात चर्चा रंगू लागल्यात. काहींनी जुने प्रकरणे बाहेर काढून हाच लोकप्रतिनिधी असेल, असे चर्चेत येऊ लागले आहे. या चर्चेमुळे पाथर्डी शहरातील राजकीय वातावरण तापून गढूळ बनले आहे.
पाथर्डी (Pathrdi) शहरातील नवी पेठेमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी एका ठेकेदाराने काही तरुणांना पाठवत तुम्ही हे काम मंजूर केलेल्या लोकप्रतिनिधींना हप्ता का दिला नाही?, अशी विचारणा केली. हप्ता न दिल्याने या तरुणांनी रस्त्याचे काम बंद पाडले. आता या रस्त्याची आणि तेथे घडलेल्या प्रकाराची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.
दोन ठेकेदारांच्या वादात पाथर्डी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता अडकून पडल्याचेही बोलले जात आहे. परंतु या रस्त्याच्या कामासाठी हप्ता मागणारा लोकप्रतिनिधी कोण?, यावरील चर्चेने अधिक जोर धरला आहे. यातून राजकीय धुमारे आगामी काळात फुटणार हे निश्चित आहे.
नवीपेठ हा भाग शहराचा मुख्य भाग आहे. या भागात असलेल्या निऱ्हाळी नाट्यगृह ते अष्टवाडा, या भागाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या चालू आहे. या रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. सुमारे १५ लाख रुपये खर्चाच्या या कामाचा ठेका शेवगावमधील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. या रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने पाथर्डी शहरातीलच एक उपठेकेदार नेमून त्याच्याकडे काम दिले आहे. या ठेकेदाराने रस्त्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरू केले आहे. (Civil Issue)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रस्त्याचे हे काम करताना अगोदर या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला आहे. त्यावर आता खडी टाकण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. परंतु रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहतूक खोळंबली आहे. वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. धुळीचे लोट उठत आहेत. हे सहन करत असतानाच या रस्त्याचे काम हप्ता मागण्याच्या प्रकारावरून चर्चेत आला आहे.
या रस्त्याचे काम सुरू असतानाच रविवारी एका ठेकादाराने काही तरुण पाठवून तू काम मंजूर करणाऱ्या लोकप्रतिनिधीला हप्ता का दिला नाही? असे म्हणत हे काम बंद पाडले. हप्ता मिळेपर्यंत काम करू नको म्हणून देखील बजावले आहे. दोन दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद पडलेले आहे. हप्ता मागण्यासाठी आलेले तरुण कोणाचे होते? कोणत्या लोकप्रतिनिधीला हप्ता पाहिजे आहे? लोकप्रतिनिधीचा हप्ता कसला? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत. या हप्ता प्रकरणामुळे रस्ता राजकीय वादत अडकणार की काय, असे चित्र आहे.
हप्ता मागणाऱ्या लोकप्रतिनिधीवर पाथर्डी शहरात चर्चा रंगू लागली आहे. गाव कट्यावर बसून थेट लोकप्रतिनिधीचे नाव घेऊन चर्चा रंगल्या आहेत. यातून काहींमध्ये वादाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ठेकेदारांनी आपआपसातील वाद लोकप्रतिनिधींना नावाखाली जिरवा-जिरवी सुरू असावी, अशीही देखील चर्चा होत आहे. ठेकेदार वादा घालून रस्त्याचा पोत बिघडवणार, असेही बोलले जात आहे. हा बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे, तो रखडल्यास ठेकेदार आणि वेळप्रसंगीत लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलन पुकारण्याचा देखील सूर आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.