

Sameer Bhujbal birthday : येवला विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात भुजबळ विरुद्ध शिंदे असा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र, राजकीय वैर बाजूला ठेवत माणिकराव शिंदे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीची सध्या येवल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी गर्दी केली होती. या गर्दीत माणिकराव शिंदे यांच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधले. भुजबळांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे यांनी स्वतः संपर्क कार्यालयात जाऊन समीर भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीत शिंदे यांनी केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर समीर भुजबळ यांना त्यांनी केलेल्या आवाहनानुसार वह्या-पुस्तकेही भेट दिली. त्याचबरोबर आपल्या घरच्या बागेतील गुलाबाचे फूल देत त्यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही भारतीय संस्कृती आहे. ज्या पद्दतीने समीर भुजबळ यांनी देखील माझ्या वाढदिवसाला माझी भेट घेऊन मला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचपद्दतीने राजकीय वैर बाजूला ठेवत मीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भुजबळांकडून पराभव
माणिकराव शिंदे हे येवल्यातील जेष्ठ नेतृत्व असून ते सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी येवल्यात खास शरद पवार यांची सभा झाली होती. मात्र, भुजबळांनी माणिकराव यांचा पराभव करुन येवल्याचा गड राखला.
भुजबळांना येवल्यात आणलं
माणिकराव शिंदे हे ऐके काळी भुजबळ समर्थक होते. २००४ मध्ये छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडणूक लढवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्थानिक नेत्यांमध्ये माणिकराव शिंदे यांचा समावेश होता. २००४ साली राष्ट्रवादीच्या औरंगाबाद येथील मेळाव्यात माणिकराव शिंदे यांनी येवल्यातील प्रसिद्ध अश्या पारंपारिक हलकडी या वाद्याचा गजर करीत येवला मतदार संघामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना संधी द्या अशी जाहीर मागणी केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये येवला मतदार संघ हा कॉंग्रेसच्या वाट्याला होता तो राष्ट्रवादीकडे घेत भुजबळांनी येवला मतदार संघात उमेदवारी केली होती.
मात्र, पुढे माणिकराव शिंदे व छगन भुजबळ यांच्यातील राजकीय संबंध बिघडले. २००९ मध्ये शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून भुजबळांविरोधात निवडणूक लढवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.