Shalarth ID Scam : 160 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड गजाआड ! कसं चालायचं रॅकेट? शाळा कशा हेरायचा? मोडस ऑपरेंडी उघड

Prashant Wadile, Modus Operandi : प्रशांत वाडिले याला अटक करण्यात आल्यानंतर तपासात कामकाजाची पद्धत समोर आली आहे. तपासातून या प्रकरणाचे धागेदोरे समोर येत आहेत.
Shalarth ID Scam
Shalarth ID ScamSarkarnama
Published on
Updated on

Shalarth ID Scam : राज्यासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडलेल्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात संशयित प्रशांत वाडिले याला धुळ्यातून अटक करण्यात आल्यानंतर आता तपासात या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला आहे. बोगस आयडीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतील तब्बल 160 कोटी रुपये वाडिले याने लुटले आहेत. त्याच्या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे.

प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून एक-एक धक्कादायक माहिती समोर येत असून आता त्याची कामकाजाची पद्धत (मोडस ऑपरेंडी) समोर आली आहे. संशयित वाडिले हा अत्यंत पद्धतशीरपणे हे रॅकेट चालवत होता. वाडिले सगळ्यात आधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा शाळा हेरुन त्या टार्गेट करायचा. त्यानंतर तिथल्या शाळा व्यवस्थापनाशी किंवा शिक्षकांशी संपर्क साधत असे.

ऑनलाइन प्रणालीमध्ये बनावट आणि खोट्या नोंदी करून तो कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षात असलेल्या संख्येपेक्षा अधिक दाखवायचा. विद्यार्थिसंख्या वाढल्याचे दाखवून त्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक मंजुरी मिळविली जायची. त्यानंतर तो या शिक्षकांच्या नेमणुकीचे बनावट प्रस्ताव आणि खोट्या मान्यता तयार करायचा. शिक्षण उपसंचालक आणि वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांशी वाडिलेचे थेट संबंध होते. या प्रभावाचा वापर करून तो बनावट प्रस्तावांना मंजुरी मिळवून द्यायचा आणि शिक्षकांचे शालार्थ आयडी जनरेट करून घेत होता अशी माहिती आता तपासातून उघड झाली आहे.

Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी 20 लाखांचा फिक्स रेट, प्रशांत वाडिलेने जमवलेली माया पाहून तपास यंत्रणा थक्क

एका शिक्षकाचा शालार्थ आयडी जनरेट करून देण्यासाठी वाडिले तब्बल 20 लाख रुपये घेत असल्याचे समोर आले असून हा त्याचा फिक्स रेट होता. इतकेच नव्हे, तर आयडी मंजूर झाल्यानंतर शिक्षकांचा जो मागील थकीत पगार निघायचा, त्या एकूण रकमेतील 50 टक्के रक्कम वाडिले स्वतः हक्काने वसूल करीत होता. याच पैशातून त्याने कोट्यावधींची माया जमवली आहे. त्याच्या बॅंक खात्याची देखील चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्याची ही काळी कमाई व मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे.

प्रशांत वाडिलेच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या झडतीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. तपासादरम्यान विविध शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेले कोरे धनादेश (चेक) तसेच कोरे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले. शिक्षकांनी पैसे बुडवू नयेत किंवा नंतर नकार देऊ नये, म्हणून हे दस्तऐवज दबावाचे साधन म्हणून वापरले जात असावेत, असा प्राथमिक संशय तपास यंत्रणेला आहे.

Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात पुण्यातील मोठा मासा गळाला; अटकेसाठी पथक मागावर

या कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात आतापर्यंत 27 शिक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय दोन शाळांमधील भरती प्रक्रिया संशयास्पद आढळून आल्याने त्यांच्याविरोधातही सखोल चौकशी सुरू आहे. या शाळांमधील नियुक्त्या, कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेची तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जात आहे.

मालेगाव, पुणेपर्यंत धागेदोरे

दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत पोहचले आहे. मालेगावमधील काही एजंट वाडिले याच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात पुण्यातूनही एक मोठा मासा गळाला लागणार असल्याच्या चर्चा आहे. त्याच्याही मागावर पोलिस आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com