Shirdi Lok Sabha Constituency : ठाकरे गट सोडल्यानंतरही बबनराव घोलप यांचा खासदारकीचा मार्ग खडतरच...

Lok Sabha Election 2024 : 1995-1999 या काळात बबनराव घोलप हे राज्याचे समाजकल्याण विभागाचे मंत्री होते...
Babanrao Gholap
Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : बबनराव घोलप हे देवळालीचे माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात ते एक नावाजेलेले व्यक्तिमत्त्व आहेत. शिर्डी मतदारसंघातून लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या घोलप यांनी सामाजिक कार्यातून मतदारांवर छाप पाडली आहे. असंघटित समाजाशी नाळ जोडलेले घोलप यांनी शिवसैनिक म्हणूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. घोलप यांनी तब्बल 50 हून अधिक वर्षे शिवसेनेशी निष्ठा राखली. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला अखरेचा जय महाराष्ट्र केला आहे. आता त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024

नाशिक जिल्ह्यात शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करणाऱ्या बबनराव घोलप यांना बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलेल्या विश्वासामुळे ते पुढे पक्षाचे काम अधिक जोमाने करत राहिले आणि 1990 च्या निवडणुकीत ते देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले. तेव्हापासून 2009 पर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1995-1999 या काळात बबनराव घोलप हे राज्याचे समाजकल्याण विभागाचे मंत्री होते. याच काळात घोलप यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सलग पाच टर्म आमदार असलेल्या घोलप यांनी सामाजिक काम थांबवले नाही. मतदारांना 24 तास उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी म्हणून घोलप यांची दखल घेतली जाते. आमदार म्हणून त्यांनी चर्मकार समाजासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्थापन केला. मतदारसंघात त्यांनी वालदेवी धरणाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केला. वालदेवी नदीवर लहान बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांनी शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवला, यासह अनेक विकासाची कामे त्यांनी केली आहेत. बबनराव घोलप चित्रपटक्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी निलांबरी या चित्रपटाची निर्मिती केली. कलेची आवड असल्याने त्यांनी अनेक कलाकार, निर्मात्यांना नेहमीच मदत केली. विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Babanrao Gholap
Sanjay Raut : बबनराव घोलप कुठे गेले ? संजय राऊत म्हणाले…

दरम्यान, शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या घोलप यांनी 2014 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारीही केली होती. त्यांना उमेदवारीही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. त्यावेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना संधी मिळाली आणि ते खासदार झाले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी घोलप इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिला. त्यातच वाकचौरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने नाराज झालेल्या घोलप यांनी नुकताच शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. ठाकरे गटाने घोलप यांना दिलेली शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतल्याने घोलप यांनी 15 फेब्रुवारीला ठाकरे गटाला जय महाराष्ट्र ठोकला. आता ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सद्यःस्थितीत शिर्डी मतदारसंघाचे विद्यमान खासदार लोखंडे हेही शिंदे गटात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या घोलप यांना शिंदे गटात जाऊन उमेदवारी मिळणार का? तसेच घोलप यांचे न्यायप्रविष्ट असलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण निकाली निघणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Babanrao Gholap
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? पाहा भुजबळांनी पवारांना कसं डिवचलं...

नाव (Name) :

बबनराव शंकर घोलप

जन्मतारीख (Birth date):

10 ऑक्टोबर 1954

शिक्षण (Education):

सहावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background):

बबनराव घोलप हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे गावात जन्म झालेल्या घोलप यांचे कुटुंब उदरनिर्वाहसाठी देवळालीमध्ये स्थलांतरित झाले होते. बबनराव घोलप यांना नाना या टोपन नावाने ओळखले जाते. त्यांना दोन भाऊ, दोन बहिणी आहेत. 1 जानेवारी 1978 रोजी घोलप यांचा शशिकला यांच्याशी प्रेमविवाह झाला. दरम्यान, घोलप दांपत्याला 3 मुले आहेत. योगेश, तनुजा आणि नैना अशी त्यांची नावे आहेत. तनुजा घोलप (भोईर) या भाजपमध्ये कार्यरत आहेत. हे दोघेही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत असून, बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला असला तरी पुत्र योगेश घोलप यांनी मात्र सदैव उद्धव ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. योगेश घोलप 2014 मध्ये देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले होते.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

शिर्डी

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट)

Babanrao Gholap
Shiv Sena Convention : 'गुलाबराव पाटलांनी राऊतांची पाकच काढली...

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

बबनराव घोलप यांनी मागासलेल्या चर्मकार समाजाला एकत्र करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. त्याचबरोबर नाटक, लोककला या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचेही काम केले. पुढे नाशिक जिल्ह्यात स्थापन झालेल्या पहिल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला गती दिली. पक्षाचे काम वाढवले. पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क वाढला आणि 1985 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी घोलप यांना पत्र पाठवून थेट देवळाली मतदारसंघाची उमेदवारी दिली.

पहिल्याच निवडणुकीत घोलप यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले होते. दरम्यान 1990 मध्ये शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली. या वेळी मात्र सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेमध्ये पोहोचलेले बबनराव घोलप विधानसभेत पोहोचले. आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. त्यामुळे त्यांना 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण विभागाचे मंत्री केले. या काळात घोलप यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. खत्री आयोग नेमला. चर्मकार समाजाला एकत्र करून चर्मकार मंडळाची स्थापना केली. त्यांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, अशा अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम घोलप यांनी केले. पुढे 1999, 2004 आणि 2009 असे सलग ते विधानसभेवर निवडून गेले. 2010 पासून शिवसेनेने त्यांची पक्षाचे उपनेते म्हणून निवड केली होती.

Babanrao Gholap
Dharashiv NCp News : पवारांचा नेता अडचणीत; मालमत्तेवर पाच कोटींचा बोजा

2014 मध्ये शिर्डी मतदारसंघाचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेकडून घोलप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निवडणुका तोंडावर आल्या असतानाच घोलप यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यानंतर मात्र त्यांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पायबंद बसला. दरम्यान, सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणावर याच महिन्यात सुनावणी होणार आहे. असे असले तरीही बबनराव घोलप निकालापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना फुटीनंतरही ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी वाकचौरे यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी सप्टेंबर 2023 मध्ये उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाकडून शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतल्याने पक्षात डावलले जात असून, अपमान केला असल्याचा आरोप करत 15 फेब्रुवारीला शिवसेना सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. आता ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, उमेदवारीची समीकरणे पाहता ते भाजपमध्येही प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Babanrao Gholap
Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 'एमआयएम'च्या पतंगाला नांदेडमध्ये हवा ?

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

महाराष्ट्र चर्मकार संघटनेची स्थापन करत चर्मकार समाज एकत्र केला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असताना मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या आहेत. खत्री आयोगाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. शासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजासाठी जवळपास 350 आश्रमशाळा, 300 वसतिगृहे त्यांनी सुरू केली. गरजूंच्या हातांना काम मिळावे म्हणून सहा सूतगिरण्या सुरू केल्या. घोलप यांनी राज्यभरात 400 वृद्धाश्रमांची उभारणी केली आहे. याशिवाय मतदारसंघातील नानेगावचा पूल बांधून त्यांनी गावकऱ्यांची दळवळणाची समस्या सोडवली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या घोलप यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला आहे. याशिवाय घोलप हे मागील 50 पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. चर्मकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील चर्मकार समाजाला एकत्र करण्याचे कार्य केले आहे. याचबरोबर घोलप हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. राजकारणासह कलाक्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्कही तितकाच विस्तारलेला आहे. घोलप हे मतदारांना 24 तास उपलब्ध असणारे राजकारणी आहेत. मतदारसंघातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

बबनराव घोलप हे सोशल मीडियाचा फारसा वापर करताना दिसून येत नाहीत, त्यांची सोशल मीडिया टीमही सक्रिय नसल्याचे दिसून येते.

Babanrao Gholap
Ncp News : शरद पवारांनी अजितदादांबाबत कोणती मोठी चूक केली?

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

बबनराव घोलप हे एक कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करताना, जर वाकचौरे यांना उमेदवारी द्यायची होती तर मला होय कशाला म्हणाला होतात, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला होता. वाकचौरे यांना मीच शिवसेनेत आणले होते. मात्र ते गद्दार निघाले, मग पुन्हा मला उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर वाकचौरेंना का उमेदवारी देत आहात, असा सवाल केला होता. भुजबळ हे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया केल्या, त्यांना पक्ष प्रवेश देऊ नये म्हणून मी प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट घोलप यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच त्यांनी शिवसेना ही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचे विधान केले होते. शिवसैनिक साखरसम्राटांच्या दावणीला बांधलेले नाहीत, आम्ही साखरसम्राटांनाही हरवू शकतो, असे वक्तव्य करत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

बबनराव घोलप हे गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी 25 वर्षे विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे, त्यातच मागासवर्गीय समाजासाठी घोलप यांनी केलेले कार्य मोठे आहे. त्यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, मागासवर्गीय समाजासाठी केलेले कार्य, सांस्कृतिक क्षेत्रातील जनसंपर्क तसेच मागील पाच वर्षांपासून ते शिर्डी मतदारसंघातून तयारी करत आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

बबनराव घोलप हे निष्ठावंत शिवसैनिक राहिले असले तरी त्यांनी अखेरच्या वेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिक या प्रतिमेला डाग लागला आहे. शिर्डी मतदारसंघात त्यांनी मनमानी करत काही शिवसैनिकांच्या नियुक्त्या रद्द करून त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पदे दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यातच आता त्यांनी वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चिच केले आहे. मात्र, लोकसभेच्या दृष्टीने त्यांना उमेदवारी मिळण्यास विद्ममान खासदार सदाशिव लोखंडे यांचा अडसर आहे. कारण तेदेखील शिंदे गटात आहेत. भाजपमध्ये प्रवेश करायचा झाल्यास ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. महायुतीचे घटक असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले हेही शिर्डी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे घोलप यांच्या उमेदवारी मार्ग खडतर आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच शिंदे गट वेगळा झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले होते. ठाकरे गटाकडूनही सुरुवातीला त्यांना होकार देण्यात आला होता. मात्र, वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे आपला पत्ता कट होणार हे लक्षात येताच त्यांनी शिंदे सेनेची वाट धरली आहे. मात्र, शिंदे गटातूनही उमेदवारीचे आश्वासन न मिळाल्यास घोलप यांचा राजकीय विजनवास आणखी पाच वर्षांसाठी कायम राहू शकतो. कारण शिंदे गटाकडे (Eknath Shinde) सध्या सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत, तर महायुतीत ही जागा आठवले यांना सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिंदे गटातून उमेदवारीची शक्यता नसल्यास आणि जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असेल तर घोलप हे भाजपशी संधान साधू शकतात, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

मात्र, जागावाटपानंतरही घोलप यांना उमेदवारी मिळणार की नाही, हा प्रश्न सध्या अनु्त्तरितच आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबण्याचा विचार केला तरी सद्यःस्थितीत देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, ती जागा अजित पवार गटाकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथेही त्यांच्या हाती फारसे काही लागू शकणार नाही, अशीच स्थिती सध्या आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com