Dhule Water Issue: गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने पिण्याच्या पाण्याबाबत दिलेली सर्व आश्वासने आणि मुहूर्त फोल ठरल्याने शिवसेनेने त्यांना चांगलेच फैलावर घेतले. नेत्यांनी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धोंडी मिरवीत ‘धोंडी धोंडी पाणी दे, धुळ्याला पाणी मिळू दे..!’ हे पारंपारीक सूर आळवीत आंदोलन केले. (Shivsena Agitation on Dhule city Drinking water issue against ruling BJP)
धुळे (Dhule) महापालिकेत सत्ताधारी भाजपने (BJP) पिण्याच्या पाणी योजनेसाठी विविध आश्वासने दिले. अद्याप त्यावर कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेने (Shivsena) भाजपला फैलावर घेत आंदोलन केले.
धुळे महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आहे. त्यांच्या कारभाराबाबत नागरिकांत नाराजी असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे वरुणराजाला घालण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातून धोंडीची मिरवणूकही काढली.
शहरासह जिल्हाभरात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्याचा थेट परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होत आहे. उभी पिके पावसाअभावी जळत आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात २५ टक्केदेखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबतही स्थिती वाईट आहे. धुळे शहरातील नकाणे व डेडरगाव तलाव कोरडेठाक झाले आहेत. या दोन तलावांतून शहराच्या अर्ध्या भागाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आगामी काळात शहरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
एकीकडे अशी परिस्थिती, तर साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे लाटीपाडा, जामखेली, मालनगाव धरण भरल्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. धुळे महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहराचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पुढल्या आठवड्यात शहराला दिवसाआड पाणी मिळेल, अशी घोषणा सत्ताधारी भाजपकडून खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धुळेकर जनता आज-उद्या-परवा करत पाणी कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. धुळेकरांची ही प्रतीक्षा लवकर संपावी, संपूर्ण जिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी शिवसेना (उबाठा) महानगरतर्फे वरुणराजाला साकडे घालण्यात आले. संबळ वाद्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातून धोंडीची मिरवणूक काढली. पदाधिकाऱ्यांनी स्वतः डोक्यावर घेतली. ही मिरवणूक महापालिकेच्या प्रवेशद्वारात आली.
येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, सुनील पाटील, सुभाष मराठे, आनंद जावडेकर, अरुण धुमाळ, ज्ञानेश्वर फुलपगारे, हेमा हेमाडे, अरुणा मोरे, प्रतिभा सोनवणे त्यात सहभागी झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.