

Nashik Politics : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून पक्षसंघटना वाढीला बळकटी देण्यात येत आहे. त्यासाठी शिंदे यांनी आपले पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले असून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी शिवसेनेने ‘शिवसंवाद दौऱ्याची’ सुरुवात केली आहे. यात राज्यभरातील २२ जिल्ह्यांतील १०० विधानसभा मतदारसंघांना भेटी देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे याची सुरुवात श्रीकांत शिंदे यांनी नाशिक मधून केली आहे.
सोमवारी (दि. १८) मे रोजी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्याचे नियोजन करताना शिंदे यांनी नाशिक लोकसभेतील इगतपुरी आणि देवळाली या दोन आणि दिंडोरी लोकसभेतील दिंडोरी आणि कळवण या दोन अशा चार विधानसभा मतदारसंघाची निवड केली होती. त्यानुसार सोमवारी शिंदे यांनी या चारही मतदारसंघाचा आढावा घेतला. राजकीय बाब म्हणजे हे चारही मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ताब्यात असून चारही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा देखील हाती घेतली आहे. मात्र, अद्याप त्यांनी संघटनात्मक बाबींवर लक्ष केंद्रीत केलेलं नाही. तीच संधी शिवसेनेने हेरल्याचे बोलले जात आहे. कारण, सत्ताधारी शिवसेनेने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आडून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात आपला पक्ष बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातून शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर डोळा तर नाही ना, अशी चर्चा आहे.
नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. १५ पैकी ७ मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यातील दोन मंत्री आहेत. आता राष्ट्रवादीच्या याच मतदारसंघात शिवसेनेने बळकटीकरण सुरु केलं आहे. इगतपुरीत- हिरामण खोसकर, देवळालीत- सरोज अहिरे, दिंडोरी-नरहरी झिरवाळ, कळवण-नितीन पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र या मतदारसंघात आता शिवसेना आपली ताकद वाढवत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिंदे सेनेने कंबर कसली असून या मतदारसंघावर विशेष फोकस केल्याचे दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचे सांगितले जाते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या यशानंतर आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यावर शिवसेना भर देत असून शिवसेनेने राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केल्याचं यातून दिसतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.