

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत एकूण ४५०० बसची व्यवस्था करण्यात येणार असून, दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे.
या नियोजनानुसार रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत ३००० बसची विशेष सेवा उपलब्ध असेल. तसेच रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्थानकांपासून पुढील प्रवासासाठी स्वतंत्र १५०० बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे मुख्य धार्मिक परिसरात खासगी वाहनांचा ताण कमी होऊन भाविकांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वाहतूक आराखड्यात बाह्य वाहनतळ, अंतर्गत प्रवासी उतरविण्याची ठिकाणे आणि रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. अमृत स्नानासारख्या गर्दीच्या दिवसांमध्ये वाहतूक कोंडी टाळणे आणि भाविकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुरळीत करणे, हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे.
रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळांपासून विशेष बस सेवा चालविण्यात येईल. यामध्ये नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी ९०० बस, नाशिकमधील वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी १४८५ बस, तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी ३२५ बस उपलब्ध असतील. गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन २९० बस राखीव ठेवण्यात येणार आहेत.
या व्यवस्थेद्वारे २४ तासांत सुमारे ४०७ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.
रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांना बस सेवेशी जोडण्यात येणार आहे. यासाठी १५०० बसचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी ५२० बस रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि ६८० बस रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. तसेच ३०० बस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेतून दररोज सुमारे ८.२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.
अमृत स्नानासाठी विशेष बसची सोय
अमृत स्नानाच्या प्रमुख दिवसांमध्ये भाविकांची सर्वाधिक गर्दी अपेक्षित असल्याने खासगी वाहनांना निश्चित केलेल्या बाह्य वाहनतळांपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तेथून पुढे भाविकांना राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसद्वारे धार्मिक परिसरापर्यंत पोहोचविण्यात येईल. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्रामुख्याने पायी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे.
संपूर्ण बस वाहतुकीवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून ही व्यवस्था एकात्मिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येईल. त्यामुळे बसची उपलब्धता, फेऱ्यांचे नियोजन, प्रतीक्षा वेळ आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे. (Nashik News)
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्यांच्या प्रवासातील शेवटचे काही किलोमीटर सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावेत, यावर आमचा भर आहे. मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि भाविकांची सुविधा लक्षात घेऊन ही विशेष बस व्यवस्था तयार करण्यात आली आहे."
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले की, अमृत स्नानाच्या दिवशी सर्वाधिक वर्दळ अपेक्षित असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे नियोजनाशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : सार्वजनिक वाहतूक नियोजन
४५०० बसची एकात्मिक व्यवस्था
• ३००० बस : रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी
• १५०० बस : रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी
• दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवासी क्षमता
• ४६ बाह्य वाहनतळ जोडले जाणार
• ५ रेल्वे स्थानकांवरून बस सेवा
रस्ते मार्गावरील व्यवस्था
• ९०० बस : नाशिक बाह्य वाहनतळ ते अंतर्गत भाग
• १४८५ बस : नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर
• ३२५ बस : त्र्यंबकेश्वर अंतर्गत वाहतूक
• २९० बस राखीव
• क्षमता : दररोज २५.३६ लाख प्रवासी
रेल्वे प्रवाशांसाठी व्यवस्था
• ५२० बस : रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ
• ६८० बस : रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर
• ३०० बस राखीव
• क्षमता : दररोज ८.२६ लाख प्रवासी
अमृत स्नान नियोजन
• खासगी वाहनांना बाह्य वाहनतळापर्यंत प्रवेश
• पुढील प्रवासासाठी विशेष बस सेवा
• रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पायी मार्गांना प्राधान्य
तंत्रज्ञान आधारित नियंत्रण
• बसवर उपग्रहाद्वारे देखरेख
• एकात्मिक नियंत्रण कक्षातून नियोजन
• गर्दीनुसार फेऱ्यांचे व्यवस्थापन
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.