

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांचे तीन दिवसांपूर्वी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार? याचे उत्तर मिळाले असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
परंतु सूनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत केला आहे. अजित पवार यांचे निधन होऊन आज फक्त चौथा दिवस आहे, अशात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे म्हणजे जास्त घाई होत नाही का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्यावर पवार म्हणाले, या संदर्भात आम्ही इथे चर्चा करत नाही आहोत, चर्चा मुंबईत होत असून सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं म्हणत एकप्रकारे पवारांनी आपल्याला चर्चेपासून दूर ठेवत अजित पवारांच्या नेत्यांनी परस्पर काय तो निर्णय घेतल्याचे शरद पवाराच्या बोलण्यातून स्पष्ट होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर काल काही विधी सुरू होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपमुख्यमंत्रीपदाबाबत औपचारिक चर्चा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व आमदार धनंजय मुंडे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबद्दल निश्चित झालं. आमदारांची बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्या म्हणून निवड करण्यात येईल अशी माहिती काल भुजबळांनी केली. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. आज पक्षाची 5 वाजता बैठक असून सुनेत्रा पवार या 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान शरद पवारांना जो प्रश्न पत्रकारांनी केला तोच प्रश्न भाजपचे संकटमोचक व मंत्री गिरीश महाजन यांनाही पत्रकारांनी केला. सूनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई होत आहे, असे वाटत नाही का? यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचा आहे. तुमचा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला खूप घाई होत असलेल्या प्रश्नावर उत्तर देताना महाजनांनी म्हटले की, काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे निर्णय घेतला असावा.
काही तरी अडचण असेल
गिरीश महाजन पुढे म्हणाले, घाई होते आहे की नाही याबाबत मी काय बोलावे? त्यांची काही तरी अडचण असेल, यामागे काही तरी कारण असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच आहे. त्यात आम्हाला कुठलीच अडचण नाही. सुनेत्रा वहिनी आणि त्यांनी ठरवावे त्यांना काय करायचे ते असे महाजन म्हणाले. एकत्र होण्याबाबत काही असत तर त्यांनी बोलावलं असतं असही महाजन म्हणाले.
दरम्यान शपथविधी बद्दल सांगताना महाजन म्हणाले, धावपळीत छोटे खाणी कार्यक्रम आहे, सर्वांनाच बोलावले नाही, मी जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान आता अवघ्या राज्याचे लक्ष्य सायंकाळच्या शपथविधीकडे लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.