नाशिक : शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करूनही तेरा महिन्यांपासून कुठल्याच महत्त्वाच्या पदावर नियुक्ती नाही तर पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेताना विचारात घेतले न जाणारे सुनील बागूल (Sunil Bagul) यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या दौऱ्याच्या दिवशीच उपनेतेपद बहाल केल्याने बागूल यांना सुखाचा धक्का दिला. परंतु, शिवसेनेचे बागूल यांचा सन्मान केला की भाजपमध्ये जाऊ नये म्हणून त्यांची कोंडी केली, असा सवाल शिवसेनेतच विचारला जात आहे.
शिवसेनेत घरवापसी झालेल्या सुनील बागूल यांना सोमवारी संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या उपनेते पदावर नियुक्त केले. वास्तविक बागूल यांना वर्षभरापूर्वीच मोठे पद देणे अपेक्षित असताना शिवसेनेत त्यांना ताटकळत ठेवले. त्यांच्यातील नेतृत्वाचा कस लावण्याची संधी दिली नाही. त्यात मनीष बागूल हा त्यांचा मुलगा भाजयुमोचा अध्यक्ष, आई भिकूबाई बागूल भाजपकडून उपमहापौर. त्यामुळे सुनील बागूल शिवसेनेत असले तरी त्यांना सन्मान नसल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा होती. त्याला पूर्णविराम मिळाला.
शिवसेनेने मक्तेदारी निर्माण होऊन पक्षाला त्याचा फटका बसू नये म्हणून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यांची कोअर कमिटी नियुक्त केली. त्यात बागूल यांना स्थान नव्हते. ही बाब त्यांच्या समर्थकांना खटकली. त्यामुळे त्यांच्या काही समर्थक भाजपशी पुर्णपणे नाळ तोडली नव्हती. भाजपनेदेखील शिवसेनेला उत्तर देण्याची रणनीती आखल्याची चर्चा होती. त्यासाठी बागूल यांना पुन्हा भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले जात होते, असे समजते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी नाशिक दौऱ्यावर येत असताना त्या पूर्वसंध्येला उपनेतेपदी निवड झाल्याची घोषणा झाली, हा योगा योग असावा का? यावर खल होत आहे.
फडणवीस यांच्या दौऱ्यात बागूल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर पंचवटीत भाजपची ताकद वाढण्याबरोबरच शिवसेनेचे पंचवटीत ताकदीने प्रवेश करण्याचे जे मनसुबे आहेत, त्याला धक्का बसला असता. त्यात शिवसेनेचे नेते शंभर प्लसचा नारा देताना भाजपचे नगरसेवक, नेते सेनेच्या संपर्कात असल्याचे भाषणांतून सांगत आहे. बागूल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता, तर शिवसेनेच्या प्रपोगंडा नीतीला धक्का बसला असता. त्यामुळे तातडीने बागूल यांची उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
घर एक, पक्ष दोन!
बागूल यांची उपनेतेपदी वर्णी लागल्यानंतर आता बागूल यांच्या घरात दोन पक्षांची सत्ता स्थाने राहणार आहेत. बागूल यांचा मुलगा भाजपकडून प्रभाग १ मधून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. पुतण्या अजय बागूल सिडकोतील प्रभाग ३६ मधून शिवसेनेच्या उमेदवारी निवडणुकीची तयारी करत आहे. प्रभाग ८ मधून संजय बागूल हे भाजपकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता उपनेते बागूल यांना समतोल राखण्याची महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.