

Nashik Politics : मंत्रालयातील कार्यालयात कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना आता त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातील कमकुवत बाजू व समस्या शोधून भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. केदार यांनी आपल्या पोस्टमधून नाव न घेता राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या मतदारसंघातील काराभारावरुन नाव न घेता ताशेरे ओढले आहेत. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन शासकीय व निमशासकीय अनेक समस्या भेडसावत आहेत. शासकीय काम आणि ६/१२ महिने थांब अशा प्रकारे अनेक हेलपाटे मारूनही अगदी शुल्लक, छोटी मोठी कामे होत नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिक करत असल्याचा दावा केदार यांनी पोस्टमधून केला आहे.
याला कारण लोकप्रतिनिधींची राजकीय उदासीनता व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणे हे आहे. असा सूर या मतदार संघातील नागरिक व्यक्त करत असल्याचं केदार यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी महायुतीच्या बरोबर सत्तेत आहे व मंत्री पण आहेत. पण या मतदारसंघातील मंत्री महोदय राजकारण करतात की त्यांच्या नावाने त्यांचे नातेवाईक व चेले पिले राजकारणाचा धंदा करत आहे हा प्रश्न पडतो असं भाजप नाशिक शहराध्यक्ष केदार यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.
या मतदार संघात सर्वसामान्यांना वालीच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असे सर्वत्र बोलले जाते. सर्वसामान्य नागरिकांना एखाद्या छोट्या छोट्या कामासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असल्याचे केदार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. थोडक्यात केवळ राजकीय उदासीनता व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक असा प्रकार सुरू आहे. लोकप्रतिनिधी, त्यांचे नातेवाईक व चेलेचपाटे व काही ठराविक पंटर लोक या ठिकाणी चुकीचे राजकारण करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असल्याचं केदार यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेक शासकीय तक्रारीबाबत उपाययोजना करण्याऐवजी भीक नको पण कुत्र आवर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तथापि या गोष्टींमध्ये आपल्यालाही तथ्य वाटत असल्याचं केदार यांनी म्हटलं आहे.
महायुती म्हणून सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत गंभीरपणे विचार करावा व शासकीय व निमशासकीय कामे सहजसुलभ कशी होतील ते पहावे असा सल्ला देत केदार यांनी मंत्री झिरवाळ यांना नाव न घेता डिवचलं आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवारी केलेल्या सुनिता चारोस्कर या आता भाजपवासी झालेल्या आहेत. त्यामाध्यमातून झिरवाळांच्या मतदारसंघात भाजप आपले जाळे टाकत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्याचाच भाग म्हणून झिरवाळांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी थेट मैदानात उतरल्याचे दिसत आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजप या निमित्ताने जाळे टाकत असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.