Nashik News : लोकसभा निवडणुकांच्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.याचवेळी राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानात दुसरीकडे पडद्यामागच्या घडामोडींनी वेग पकडला आहे.तर देशपातळीवर इंडिया आघाडीसाठी खल सुरू आहे तर महाराष्ट्रात जागावाटपाचं भिजत घोंगडं मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीची धग अजून कायम असतानाच आता पुन्हा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं विधान केले.महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.ते म्हणाले, “बघा,निवडणुकीच्या आधीच होईल.आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असं महाजन म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांभोवती संशयाचं दाट धुकं आहे.त्याच पार्श्वभूमीवर मोदी-शाह जोडी लोकसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.त्यात लवकरच विधानसभा अध्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्याची शक्यता आहे.याच धर्तीवर मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
रोहित पवारांची (Rohit Pawar) आणि बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने शुक्रवारी छापेमारी केली. त्यावर महाजन म्हणाले, ही चौकशी नियमानुसार सुरू आहे.ईडीची चौकशी अचानक उभी राहत नाही.त्याची प्रक्रिया आहे. सुरुवातीस चौकशी होते.त्याचे स्पष्टीकरण मागितले जाते. अनेक दिवसांच्या कागदोपत्री व प्रत्यक्ष चौकशीनंतर ईडीची पुढील प्रक्रिया सुरू होते. बारामती अॅग्रो कंपनीत अनियमितता आहे. गडबड असल्यानेच कारवाई होत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गिरीश महाजनांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.मी आमदार आहे आमदारच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.माझा लोकसभेचा कोणताही विचार नसून माध्यमांनीच हा विषय काढला असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपल्याला सत्तेची हाव नसून पक्षाने आमदारकी नाही दिली तरी आपण पक्षाचे काम करत राहू. त्यामुळे इकडे पडलो की तिकडे जायचं चोऱ्या माऱ्या करायच्या असे उद्योग मी करत नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना चिमटा काढला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच आहे. मात्र ते आरक्षण कायमस्वरूपी हवे. गत वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तसा प्रयत्न केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे ते आरक्षण टिकले नाही. आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता आमचे सरकार घेत आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल पण आरक्षण सर्वच पातळ्यांवर टिकले पाहिजे असा आमच्या सरकारचा आग्रह असल्याचे महाजन म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.