
Nashik News : जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी सध्या आक्रमक आहेत. कांदा उत्पादकांना अनेक समस्या त्रस्त करीत आहेत. कांद्याचे दर कोसळले आहेत. कांदा निर्यात बंदी उठवावी म्हणून राज्यातील अनेक विक्रेत्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे या दौऱ्यात ते काय आश्वासन देतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
मुक्त विद्यापीठात झालेल्या कृषी प्रदर्शनाला केंद्र आणि राज्याच्या कृषिमंत्र्यांनी एकत्र भेट देण्याचा योगायोग आज जुळून आला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे कोणता पुढाकार घेतात याची चर्चार रंगली होती. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान त्यावर काय उपाय करतात याची उत्सुकता लागली होती.
दरम्यान केंद्रीय कृषिमंत्र्यांनी यावेळी उपस्थित नाशिकच्या सर्वच लोकप्रतिनिधींचे विविध उपमा देत कौतुक केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे, असा दावा केला.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र बसू, तुम्ही तुमची टीम घेऊन दिल्लीला या असे आमंत्रण केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिले. तसेच आपण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय तो तोडगा काढायचा याचा निर्णय घेऊ, असेही आश्वासन शिवराजसिंह चौहाण यांनी कोकाटे यांना दिले.
शेतकऱ्यांना पूर्वी पीक विमा मिळत नव्हता. एखाद्या गावात नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई दिली जात नव्हती. संबंध तालुक्यात नुकसान झाले तरच भरपाई मिळत होती. हे चित्र मी बदलले आहे. आता उपग्रहाद्वारे फोटो घेऊन पिकांचे पाहणी केली जाते नुकसान झालेल्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात भरपाई जमा केली जाते, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी केला.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. ज्याचे उत्पादन जास्त त्यांना दुसऱ्या पिकांकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नवनव्या पिकांचे क्षेत्र आणि लागवड कशी वाढेल असा आमचा प्रयत्न आहे. अनुदानात गैरव्यवहार असेल तर, मी व्यक्तिशः त्यात लक्ष घालीन. दुसऱ्या देशांमध्ये विविध प्रकारचे बेदाणे आहेत. बेदाण्याचे हे प्रकार भारतात आणता येतील का? हा माझा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.