Pune : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात असताना प्रकाश आंबडेकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मात्र यात मोठी आघाडी घेतली. आघाडीने बुधवारी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न सुरू होते. पण जागावाटपावरून चर्चा फिस्कटली. मुस्लिम, ओबीसी तसेच इतर समाजातील अधिकाधिक उमेदवार देण्याचा त्यांचा आग्रह होता.
आता विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. बुधवारी जाहीर केलेल्या दहा उमेदवारांमध्ये सर्वजण मुस्लिम आहेत. हे या यादीचे वैशिष्ट्य म्हणावे लागले.
वंचितच्या यादीमध्ये सांगली, पुण्यातील हडपसर, कल्याण पश्चिम, औरंगाबाद मध्य, परभणी या प्रमुख मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मलकापूर, बाळापूर, गंगापूर, माण आणि शिरोळ या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे.
मलकापूर – शेहजाद खान सलीम खान
बाळापूर – खातिब सैय्यद नतीकुद्दीन
परभणी – सैय्यद सामी सैय्यद साहेबजान
औरंगाबाद मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सैय्यद
कल्याण पश्चिम – अय्याज गुलझार मौलवी
हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला
माण – इम्तियाज जाफर नदाफ
शिरोळ – आरिफ महामद्दाली पटेल
सांगली – अल्लाऊद्दीन हयातचंद काझी
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचाही अकोला मतदारसंघात पराभव झाला. मागील निवडणुकीत पक्षाला मिळालेला जनाधार यावेळी राहिला नाही, हे दिसून आले. आता विधानसभा निवडणुकीत ते कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षण, मुस्लिम, आदिवासींचे प्रतिनिधित्व आदी मुद्दे ते प्रकर्षाने मांडत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.