Yavatmal News : नागपूर पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष क्रांती पाटील कमारकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. काँग्रेसच्या एका स्थानिक बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते येत्या पाच ऑक्टोबरला राष्ट्रवादीत सहभागी होणार आहेत. या पक्षप्रवेश समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बाहेरच्यांना जास्त महत्त्व दिले जात असल्याने पाटील यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) चिंतन शिबिर नागपुरात पार पडले. या शिबिरात विदर्भाकडे जास्त लक्ष देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. अधिकाधिक मंडळींना पक्षासोबत जोडण्याचा आणि त्यांच्या मिसळण्याचा सल्लावजा आदेशही पक्षातर्फे सर्वच नेत्यांना व मंत्र्यांना दादांनी दिला होता. मात्र आता पक्षाच्या जुन्या लोकांनाच थोपण्याची वेळ आली असल्याचे या राजीमान्यावरून दिसून येते. मंगळवारी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बुधवारी यात यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्षाची भर पडली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (Shivsena) सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादीच्यावतीने बाळासाहेब पाटील हे उपाध्यक्ष होते. पुसद तालुक्यातील सेलू सर्कमधून ते निवडून आले होते. अजितदादा यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पाटील हेसुद्धा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले. त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते.
काँग्रेस नेते आणि त्यांच्याच मुलाबाळाचा विचार करीत असल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. काँग्रेसचे प्रदेश सचिव देवानंद पवार यांनी या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता सहकार क्षेत्रात सक्रिय असलेले तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रारी माजी मंत्री वसंत पुरके यांनी पक्षाकडे केली होती. दुसरीकडे देशमुख यांनी शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे आणि वसंत पुरके यांना काँग्रेस पक्ष आपल्या कुटुंबापुरता मर्यादित करून ठेवला असल्याचा आरोप केला होता. एक तर मला तिकीट द्या नाहीतर मुलांना हेच जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. आम्ही काय फक्त पक्षाच्या सतरंज्याच उचलायच्या का असा सवालही त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला केला होता.
देशमुख हे आपल्यासोबत काँग्रेसचे सुमारे अडीचशे ते तीनशे कायकर्तेही घेऊन जाणार आहेत. जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्ते सोडून चालल्याने काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.