Gondia Political : प्रशासकीय दिरंगाई काय करू शकते याचा नेम नाही. चक्क अहवालच न दिल्याने आमगाव व तिरोडा तालुक्याची ग्रामस्वच्छता अभियानाची तपासणी रखडली आहे. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेला तालुक्याच्या उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. सुदृढ आरोग्यासह जनतेचे जीनवस्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
त्यातील एक भाग म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच या अभियानाला गालबोट लागले आहे. दोन तालुक्याच्या समितीने अद्यापपर्यंत तपासणी अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हास्तरीय समितीपुढे तपासणी कशी करावी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी जिल्हास्तरीय समितीकडून तिरोडा व आमगाव या दोन तालुक्याची तपासणी रखडली आहे.
परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रीय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येत आहे. मागील 11 ऑक्टोबर 2023 रोजी अभियानाला सुरुवात झाली. दरम्यान जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद गटनुसार तपासणी अभियान 6 जानेवारीपर्यंत राबवून अहवाल सादर करणे गरजेचे होते.
सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया या सहा तालुक्यात वेळेपूर्वी तपासणी होऊन अहवालही सादर झाला. मात्र आमगाव व तिरोडा या दोन तालुक्याची तपासणी झाली असली तरी अहवाल मात्र यंत्रणेपर्यंत न पोहचल्याने जिल्हास्तरीय तपासणी रखडली आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय तपासणी 30 जानेवारीपूर्वी होणे अपेक्षित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत मतपरिवर्तन व गावागावांतून सुरु असलेल्या स्वच्छता चळवळीत ग्रामीण भागातील नागरिकांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग वाढवला जात आहे. वेगवेगळ्या ग्रामपंचायती, तालुके व जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलुंतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवण्यात येत आहे.
त्यातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरिता ग्रामस्वच्छता अभियान महत्वाचे आहे. या अभियानातून स्वच्छतेचा जागर करून ग्रामपंचायतीत समाविष्ट गावातील शौचालये, हागणदारीमुक्त तपासणी अहवाल, दुरुस्ती शौचालये, एक खड्डा ते दोन खड्डा शौचालये यांकरिता कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखून ग्रामपंचायत स्तरावर समिती गठण व कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार 6 जानेवारीपूर्वी तालुकास्तरीय जि. प. गटनिहाय अहवाल सादर करणे व 30 जानेवारीपूर्वी जिल्हास्तरीय तपासणीपुर्ण करणे आवश्यक होते. मात्र दोन तालुक्याचा अहवाल अद्यापही सादर न झाल्याने या तपासणीला गालबोट लागले आहे. एकदरीत यंदाच्या अभियानाचा विचार केल्यास हे अभियान कागदोपत्रीच चालल्याचेही दिसून येत आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.