

Akola Politics : अकोला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे मिटकरींना सुप्रिया सुळे यांची माफी मागावी लागली आहे. मिटकरी यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या होत्या. अखेर मिटकरींनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'सरकारनामाशी' बोलताना मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. अशाच एका वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागावी लागली आहे. मिटकरी यांनी हे वक्तव्य वाशीम येथील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात केलं होतं. ते म्हणाले होते, महिला आरक्षणावर केलेल्या लोकसभेतील भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, फार कमी बहिणी अशा आहेत की, ज्यांच्या पाठीशी भाऊ उभा राहतो. मी त्यांच्या मताचं १०० टक्के समर्थन करतो.
कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी तन-मन आणि धनाने अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे. म्हणून सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून लोकसभेमध्ये निवडून येतात, तर मिटकरींच्या या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला.
खासदार सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तन आणि मन लावून नेहमीच लढाई लढली आहे. मात्र, धनाचे राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही. अमोल मिटकरी यांचा गैरसमज आहे की, आम्ही धनाने निवडणूक लढतो. त्यांचं मला माहिती नाही, पण अजितदादा आणि मी आजवर धनाने निवडणूक लढलो नाही. अमोल मिटकरींना विनंती आहे की, धन आणि निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीय यांच्यात गल्लत करू नका, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मिटकरी यांना दिला होता. आता यावर आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार सुप्रिया सुळे या माझा बहिणीसारख्या असून, त्यांची मी माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.
माझा भाषणातील नेमका तेवढाच व्हिडिओ कट करून दाखवल्या गेल्याचं मिटकरी यांचं म्हणणं आहे, तर 'धन' म्हणजे हे आर्थिक धन नसून ते वैचारिक धनदेखील असतं. धनाचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. माझा उद्देश हा होता की, अजितदादांसारखा मोठा भाऊ आणि ताई हे जे भावा बहिणीचे नातं आहे. ते एकमेकांना तो राजकीय आधार पण आहे. शेवटी मी राष्ट्रवादी पक्षात काम करतोय तो पक्ष नाही एक परिवार आहे.
माझा या बोलण्याने ताईंना वाईट वाटलं असेल, तर त्यांची मी जाहीर माफी मागायला मला कमीपणा वाटत नसल्याचं मिटकरी यांचं म्हणणं आहे. म्हणून मी ट्विटर अकाउंटवरून जाहीर माफी मागितली, मी ट्रोलर्सकडून होत असलेल्या ट्रोलचीपण चिंता केली नाही, असेही मिटकरी म्हणाले, तर ताई या माझा मोठ्या बहिणीसारख्या असून, खरंच माझा वक्तव्यामुळे त्यांना दुखावल्या गेलं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागत असल्याचं मिटकरी म्हणाले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.