
Nagpur, 21 June : पूर्व विदर्भातील नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल पक्षातर्फे तत्काळ घेण्यात आली आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एका नेत्याची मनमानी आणि त्याने केलेल्या परस्पर नियुक्तांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची पूर्व विदर्भाचे संपर्कमंत्री आणि माजी मंत्री दीपक सावंत यांची संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या बदलातून शिवसेनेने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पूर्व विदर्भाचे समन्वयक नरेंद्र भोंडेकर यांना लगाम घातला असल्याचे दिसून येते.
शिवसेनेने (Shivsena) यापूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्कमंत्री म्हणून मृदा संधारण मंत्री संजय राठोड यांची नियुक्ती केली होती. ही जबाबदारी आता आशिष जयस्वाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राठोड यांच्याकडे पश्चिम विदर्भ देण्यात आला आहे. जयस्वाल हे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्रीसुद्धा आहेत.
माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना विदर्भाचा (Vidarbha) चांगला अभ्यास आहे. एकत्रित शिवसेना असताना ते विदर्भाचे संपर्क प्रमुख होते. विदर्भातील सर्वच नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. आता पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त केले आहे.
विदर्भात शिवसेना वाढवण्यासाठी एका जिल्ह्यांत तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले जात आहेत. पूर्व विदर्भाचे समन्वयक होताच आमदार भोंडेकर यांनी मोठ्या प्रमाणात संघटनेत फेबरबदल सुरू केले होते. अनेकांच्या नियुक्ता केल्या होत्या. हे करीत असताना त्यांनी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. साधी विचारणासुद्धा ते करीत नव्हते. त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झाली होती.
पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव, आमदार कृपाल तुमाने आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यांनी सर्वांना समन्वयाचा सल्ला दिला होता. सोबतच काही नियुक्त्यांना स्थगिती दिली होती.
त्यानंतर खासदार शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भात संघटना आणि नियुक्तांबाबतचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांना दिले असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.