
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.
माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचा यात समावेश आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात 'आउटगोइंग' सुरू झाले असून ते सर्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत.
अजित पवार महायुतीत (Mahayuti) सहभागी झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यात दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली गेली होती. अनेक ज्येष्ठांनी अनिल देशमुख आणि रमेश बंग यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. त्यामुळे अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी प्रशांत पवार आणि ग्रामीणमध्ये बाबा गुजर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या हातात जिल्ह्याची जबाबदारी सोपवली.
राज्यात सत्ता असताना लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला समोरं जावं लागले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीत हाच कौल कायम राहील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणले. अजित पवारांना जिल्ह्यातील बारापैकी एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे अजित पवार गटात आणखीच नाराजी पसरली होती.
मात्र विधानसभेचा निकाल जाहीर होताच सर्वांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले. दुसरीकडे विदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाही उमेदवाराला विजय साकारता आलेला नाही. माजी मंत्री रमेश बंग पराभूत झाले, तर अनिल देशमुख यांना मुलाच्या हट्टामुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणे सुरू केले आहे.
रमेश बंग यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राजाभाऊ टांकसाळे, अनिल देशमुख यांचे समर्थक दिलीप पनकुले, सेवा दलाचे अध्यक्ष जानबा मस्के, बजरंगसिंग परिहार यांच्यासह माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. याशिवाय अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. काही इच्छुकांना प्रफुल्ल पटेल यांनी थांबवले असल्याचे समजते. विधानसभेत बंडखोरी करणारे आणि पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा प्रवेश द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.