

Nagpur and Chandpur Political News : गेल्या २२ दिवसांपासून चंद्रपुरात ओबीसी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. नागपूरच्या संविधान चौकातही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू आहे. आज (ता. २९) मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. (The government accepted all the demands of the National OBC Federation)
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले की, आज मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. ३०) सकाळी स्वतः चंद्रपूरला जाऊन ओबीसींचे उपोषण सोडवणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपुरात येऊन संविधान चौकात सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषणही ते सोडवणार आहेत. त्यामुळे उद्या नियोजित असलेले ‘चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन’ आम्ही स्थगित केले आहे, असे डॉ. तायवाडे म्हणाले.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातिनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर (ता. २९) तोडगा निघाला.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर आज दुपारी दोन वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्त्वतः मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले. या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासनसुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे उद्याचा चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित करण्यात आला आहे.
आजच्या बैठकीला राज्याचे वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे,अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर तसेच डॉ. अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे, अनिल शिंदे, अनिल डहाके आदी ओबीसी नेते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे करण्यात येईल, असे डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.