
नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दोघांच्याही पॅनेलचे 6-6 संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यासाठी ईश्वरचिठ्ठी किंवा फोडाफोडी राजकारण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईश्वरचिठ्ठीवर अवलंबून न राहता दोन्ही गट फोडाफोडीच्या कामाला लागले असल्याने सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.
भंडारा जिल्हा सहकारी दूध संघ विदर्भातील सर्वाधिक दुधाचे संकलन करणारा संघ आहे. या संघावर आपली सत्ता आणण्यासाठी नाना पटोले आणि शिवसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हातमिळवणी केली होती. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद झाला होता. आम्ही दूध संघाला वाचवण्यासाठी हातमिळवणी केला असल्याचा दावा पटोले यांनी केला होता. तर प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचा दूध संघ बुडवला, आता त्यांना भंडार संघ बुडवायचा असल्याचा आरोपही पटोले यांनी केला होता.
पण भोंडेकर यांचा पटोले यांना काहीच फायदा त्यांना झाला नाही. भोंडेकर यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने त्यांना ताकद दाखवून दिली. असे असले तरी त्यांनाही दूध महासंघावर वर्चस्व स्थापन करता आले नाही. संघाचे माजी अध्यक्ष काटेखाये हे महायुतीसोबत आहेत. दूध संघ आणि संघातील सर्व बारकावे आणि राजकारण त्यांना ठावूक आहेत. प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे आमदार परिणय फुके अशा दोन बड्या नेत्यांची साथ त्यांना आहे.
अध्यक्षपदासाठी महायुतीची पसंती पुन्हा काटेखाये यांनाच असल्याचे समजते. पण ते एक मत कसे खेचून आणतात यावर सर्व भिस्त अवलंबून राहणार आहे. जिल्हा दूध संघाच्या सत्तेत पुन्हा प्रवेश करण्याच्या दृष्टीने काटेखाये आक्रमक आहेत. यासाठी महायुतीकडून फोडाफोडीसाठी साम-दाम-दंड-भेद या सगळ्याचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक थरारक होणार आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवार रिंगणात होते. दूध संघाच्या 12 संचालक पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. एकूण 169 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका बाजूला काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळासह माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात सहकार विकास पॅनलने निवडणूक लढविली. मतमोजणीनंतर आलेल्या निकालानुसार, दोन्ही पॅनलचे प्रत्येकी सहा संचालक विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत लाखनी-शरद कोरे, साकोली-मनोहर लंजे, लाखांदूर-विलास शेंडे, मोहाडी-नरेश पोटफोडे, पवनी-विलास काटेखाये, भंडारा-हितेश सेलोकर, तुमसर-मुकुंदा आगाशे, इतर मागासवर्ग प्रतिनिधी-विवेक पडोळे, भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्ग-आशिष पातरे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी-आशिष मेश्राम,महिला प्रतिनिधी गट-अस्मिता शहारे, अनिता तितिरमारे हे निवडून आले. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांना पराभव पत्करावा लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.