Nagpur News : लोकसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी तयार केलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याने भाजपने पक्षांतर्गत मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघापासून याची सुरुवात केली आहे. या मतदारसंघातील बुथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख यंत्रणा तत्काळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभेची निवडणूक पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. वर्षभर निवडणूक मोडमध्ये असलेली भाजप (Bjp) आणि पक्षाची तयारी बघता गडकरींच्या दाव्याचे त्यावेळी कोणाला फारसे आश्चर्य वाटले नव्हते. फारफार एक लाखांचा फरक पडले असे बोलले जात होते. मात्र, निवडणकीचा निकाल आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दीड लाखांच्यासुद्धा मताधिक्याजवळ पोहचता आले नाही. निकालाची आकडेवारी आल्यानंतर भाजपचे नेते खडबडून जागे झाले. कोणी काम केले, कोणी नाही याचा शोध घेतला जात होता. भाजपच्यावतीने बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, पन्ना प्रमुख घर चलो अभियान, संपर्क अभियान असे शेकडो कार्यक्रम राबवण्यात आले होते.
संत, महात्मे यांची जयंती, पुण्यातिथी प्रत्येक बुधवर साजरी केली. सोबतच पन्ना प्रमुखांकडे मतदार याद्यांच्या वाचानाचा कार्यक्रमसुद्धा सोपवला होता. निवडणुकाचा चोख बंदोबस्त झाला याच अविर्भावत भाजपचे नेते व पदाधिकारी वावरत होते.
निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी फक्त कागदोपत्रीच कार्यक्रम राबवल्याचे समोर आले आहे. हे लक्षात घेऊन भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची बुथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख यंत्रणा ताबडतोब बरखास्त करण्याचे निर्देश मंडळ अध्यक्षांना दिले आहे. याशिवाय उर्वरित मंडळांनासुद्धा 25 जुलैपर्यंत नवीन यंत्रणा तयार करून ती सादर करण्यास सांगितले आहे.
अनेकांची नावे मतदार यांद्यामधून गहाळ
मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे मतदार यांद्यामधून गहाळ झाल्याचे समोर आले. अनेकांच्या नावांसमोर ‘डिलीट' असा शिक्का मतदार याद्यांमध्ये मारण्यात आला होता. काहींचे मतदान केंद्र बदलण्यात आले होते. हे बघता बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि पन्ना प्रमुखांनी मतदार याद्यांचे वाचनच केले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.