

BJP's formula for victory : विजयानंतर उन्माद करू नये आणि पराभवानंतर खचून जाऊ नये, असे शहाणे-अनुभवी लोक कायम सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, अशी म्हण मराठी भाषेत आहे. शेजाऱ्याच्या घराला आग लागली, तर ती उद्या आपल्याही घरापर्यंत येऊन पोहोचते, असेही सांगितले जाते. हाच धागा पकडत भाजपने लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे निवडणूक प्रमुख जाहीर केल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
कालावधीनुसार लोकसभा निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात, तर विधानसभा निवडणूक पुढील वर्षाअखेरीस होणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपने दोन्ही निवडणुकांसाठी एकाचवेळी प्रमुख जाहीर करत या दोन्ही निवडणुका एकावेळी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता सर्वपक्षीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. (Now the all-party movement has gained momentum)
१९९९ मध्येही असाच प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना आणि भाजपलाही यामुळे मोठा फटका बसला होता. त्यामुळे अशा प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रत्येक घटकाचा विचार करण्याची गरज आहे. सध्या या विषयावर अंतिम निर्णय केंद्रीय हायकमांड घेईल, असे एकंदरीत परिस्थितीवरून वाटते.
राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचे पारडे कोणत्या बाजूला झुकेल, याबाबत खुद्द भाजप नेत्यांमध्ये साशंकता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर राज्यात फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने एक प्रस्तावदेखील चर्चेत आहे. त्यामुळेच या निवडी एकत्र झाल्या असाव्यात, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटप, मतदारसंघनिहाय आढावा इच्छुकांशी चर्चा, सर्वेक्षण आदी घडामोडींत सगळ्याच पक्षांनी आघाडी घेतली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीने अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे. भाजप बाराही महिने निवडणूक मोडवर असल्याने सातत्याने तयारीत राहणे, ही त्यांची पद्धत आहे.
काँग्रेसने मुंबईत नुकताच सर्व जागांचा आढावा घेत इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यात चुकूनही विधानसभेवर चर्चा होणार नाही, याची काळजी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना देत आहे. सर्वच पक्षांकडून लोकसभा केंद्रस्थानी ठेवून हालचाली सुरू आहेत.
दोन्ही निवडणुका एकत्र झाल्याचा काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी फटका बसू शकतो. विशेषतः मोदींचा प्रभाव किती राहणार, यावर सत्ताधारी आणि विरोधकांची गणिते अवलंबून असतील. एकत्र लढल्यास भाजपमधील अंतर्गत धुसफुस शमवण्यास फायदा होऊ शकतो, असे आडाखे बांधले जात आहेत. तीच स्थिती काँग्रेसबाबत होऊ शकते.
भाजपची सावध चाल..
भाजपने लोकसभा निवडणूक प्रमुख निवडताना सावध आणि हुशारीने चाल खेळली आहे. भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्राची सूत्रे विजय शिवणकर यांच्याकडे देण्यामागे नव्या-जुन्यांचा (भाजप - ऱाष्ट्रवादी) समन्वय, ही महत्त्वाची बाब लक्षात घेतली आहे. माजी मंत्री महादेव शिवणकर यांचे सुपुत्र विजय शिवणकर हे भाजपचे जुने शिलेदार आहेत.
काही काळापुरते विजय शिवणकर हे भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत घड्याळाचा गजर ऐकण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते. मात्र, नेते जास्त व कार्यकर्ते कमी अशी ओळख असलेल्या पक्षात ते स्थिरावू शकले नाही. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बहुमत नसताना जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी विराजमान होणारे शिवणकर हे आज भाजपचेच नेते आहेत.
(Bhandara) भंडारा - गोंदिया (Gondia) लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्याविरोधात सध्या अंतर्गत धुसफुस आहे. त्यांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. ज्यांच्याशी टोकाचे राजकीय वैर, त्यांच्याशी पक्ष म्हणून जुळवून घेण्याचे अवघड जागेवरचे दुखणे त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. हे दुखणे मिटवण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.