Buldhana LokSabha Constituency : शेतकऱ्यांना आधार वाटणारा युवा चेहरा ः रविकांत तुपकर

Buldhana Political News : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता अशी रविकांत तुपकरांची ओळख...
Buldhana Lok Sabha Constituency
Buldhana Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

LokSabha Election 2024 : बुलढाणाच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांना आधाराचा वाटणारा चेहरा म्हणून शेतकरीनेते रविकांत तुपकर यांची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सावळा या छोट्याशा गावातून आपली कारकीर्द सुरू करणारे रविकांत तुपकर हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले आहे. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते आहेत. राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नसल्याने त्यांनी 2017 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. (Latest Marathi News)

विद्यार्थी, तरुण, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली आहेत. त्यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग असतो. कला शाखेतून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात केली.

Buldhana Lok Sabha Constituency
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 2021 मध्ये सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. कृषी कायद्यांविरोधात रेल रोको आंदोलनात ते सर्वात पुढे होते. कर्जमाफीसाठी पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा त्यांनी काढली. अलीकडेच त्यांनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठीही आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत तुपकर आणि केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची चर्चाही घडवून आणली.

नाव (Name)

रविकांत चंद्रदास तुपकर

जन्मतारीख (Birth date)

13 मे 1985

शिक्षण (Education)

कला शाखेचे पदवीधर

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात डोंगरकाठाशी असलेल्या सावळा नावाच्या एका छोट्याशा खेड्यात चंद्रदास व गीताबाई तुपकर या दाम्पत्याच्या पोटी रविकांत यांचा जन्म झाला. आई-वडील, तीन काका, एक भाऊ, एक बहीण असे हे कुटुंब पिढीजात शेती व्यवसायावर अवलंबून आहे. घरची शेती आणि घरची जनावरे सांभाळून इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवणारे तुपकर कुटुंब. अगदी सुरुवातीपासूनच रविकांत तुपकर यांच्या वाट्याला संघर्ष आला. शाळेत असतानाच बुलढाणा शहरात घरोघरी दूधवाटप करून शिवाय शेतातील अगदी नांगरणी, वखरणीपासूनची सर्व कामे करून रविकांत तुपकर यांनी शिक्षण घेतले. अख्खे कुटुंब शेतात काम करते, तरीही आपली परिस्थिती सुधारत का नाही, हा प्रश्न शालेय जीवनातील रविकांत तुपकरांसमोर उभा राहिला आणि तेथूनच खऱ्या अर्थाने शेतकरी चळवळीचे बीजारोपण झाले.

Buldhana Lok Sabha Constituency
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून वयाच्या अवघ्या सोळाव्या-सतराव्या वर्षी विहिरीत केलेले पहिलं आंदोलन ते अगदी मुंबईतील मंत्रालय ताब्यात घेण्यापर्यंतचे सरकार हादरविणारे काल-परवाचे आंदोलन गेल्या २० वर्षांतील तुपकरांविषयी संघर्ष सांगणारे आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली आंदोलने आणि त्यातून दाखल होणारे गुन्हे, त्यामुळे चढायला लागणारी कोर्टाची पायरी, हे सर्व समीकरण आपसूकच जुळत गेले आणि यातून ॲड. शर्वरी सावजी यांच्याशी सूर जुळले आणि पुढे विवाह असा संसाराचा गाडा मार्गी लागला.

सांसारिक पाश त्यांच्यातील कार्यकर्त्याला थांबवू शकला नाही. त्यामुळे लग्नानंतरही आजतागायत रविकांत तुपकर चळवळ व आंदोलनात सक्रिय राहिले व संसाराचा गाडा ॲड. शर्वरी यांनी पुढे रेटला. मुलगी यज्ञजा व मुलगा देवव्रत यांच्या जन्मावेळी रविकांत तुपकर हे शेतकरी प्रश्नांवर पदयात्रेत होते, हे उल्लेखनीय. दोन्ही मुलांच्या जन्मानंतर सुमारे महिनाभराने त्यांनी आपल्या मुलांना पाहिले.

Buldhana Lok Sabha Constituency
Protest : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर एसटी महामंडळाची बस जाळली

नोकरी किंवा व्यवसाय काय (Service/Business)

रविकांत तुपकर यांनी पूर्णवेळ शेतकरी चळवळीला वाहून घेतले आहे. शेतकरी आणि तरुणांचे मोठे संघटन उभे करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणे हाच एकमेव उद्योग तुपकरांचा अगदी महाविद्यालयीन जीवनापासून सुरू आहे. मी एक रुपया कमावत नाही, माझे घर माझी बायको चालविते, हे तुपकर मोठ्या अभिमानाने सांगतात. शिवाय वडिलोपार्जित शेतीतून अन्नधान्य मिळते. शेतकरी चळवळ आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रभर उभी केलेली अगदी सर्वच स्तरांतील शेतकरी, तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांची भली-मोठी फौज हीच रविकांत तुपकर यांची खरी संपत्ती आहे. राज्यभर फिरून विविध क्षेत्रांतील लोकांशी निर्माण केलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे संबंध हीदेखील रविकांत तुपकरांसाठी एक मोठी जमेची बाजू आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

बुलढाणा

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

अद्याप निश्चित नाही, काही पक्षांकडून ऑफर आहे. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक व तरुणांच्या हिताला प्राधान्य देणारा पक्ष असावा, ही ठाम तुपकरांची भूमिका आहे. शिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तुपकरांसाठी तयार झालेली लाट पाहता त्यांची स्वतःच्या बळावर अपक्ष लढण्याचीदेखील तयारी आहे.

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

रविकांत तुपकर यांनी आतापर्यंत कोणतीच निवडणूक लढवली नाही. परंतु अनेक निवडणुकांमध्ये राज्यभर प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. प्रभावी वक्तृत्वशैली, प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आणि समोरच्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने बांधून ठेवण्याची हातोटी पाहता अनेक निवडणुकांत राज्यस्तरावर स्टार प्रचारक म्हणून तुपकरांनी जबाबदारी पार पाडली आहे.

एक वेळ विधानसभेसाठी आणि एक वेळ लोकसभेसाठी तयारी करून आणि विजयाची खात्री असतानाही संघटना आपल्यासाठी जागा सोडवून घेण्यात अयशस्वी ठरल्याने रविकांत तुपकरांना नाईलाजास्तव थांबावे लागले. परंतु यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाखो शेतकरी व शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधूनही लोकसभा निवडणूक लढवावीच, असा आग्रह आहे. प्रत्येक वेळी आपलाच बळी का? यावेळी शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत पोहोचलाच पाहिजे, असा निर्धार शेतकऱ्यांचा आहे. ते गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी चळवळीत सक्रिय काम करत आहे. आजवर हजारो आंदोलने केली. शेकडो गुन्हे अंगावर आहेत, बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगला, तडीपारीदेखील सोसली. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांच्या न्याय हक्कांसाठी केलेली आंदोलने राज्यभर नव्हे, तर देशभर गाजली आहेत.

Buldhana Lok Sabha Constituency
BJP MLA : 'मी मुख्यमंत्री असल्यासारखाच… मुख्य सचिव, कलेक्टरही नाही म्हणणार नाहीत;' भाजप आमदार नाराज?

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात शासनाच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) दिले होते. काही काळ या पदावर काम केले, परंतु शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांसाठी राज्यमंत्रिपदाचा त्याग केला, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारलेला लढा, त्या प्रश्नाची राज्य व केंद्र शासनाकडे केलेली अभ्यासपूर्ण मांडणी व त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात मिळालेली मदतीची रक्कम पीकविम्याची रक्कम, नुकसानभरपाई यामुळे ही आंदोलने राज्यभर गाजली आणि यशस्वीदेखील झाली आहेत. 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलनाने राज्य सरकार हादरले होते.

अखेर सरकारला नमती बाजू घेत शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. त्यानंतरही नागपूर येथे झालेले आंदोलन सरकारला धडकी भरवणारे ठरले. ठोस असा राजकीय प्रवास नसला तरी शेतकरी चळवळीतील संघर्ष आणि आंदोलनाचा वीस वर्षांचा प्रवास आणि या प्रवासात बुलढाणा लोकसभा मतदारसंघच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांची, सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांची प्रचंड फौज निर्माण करण्यात यश मिळाले, ही तुपकर यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

केवळ वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून घेण्यापर्यंत मर्यादित ठरणारी सामाजिक कामे न करता प्रत्यक्ष कृतीतून खऱ्या अर्थाने समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा, अशी सामाजिक कामे रविकांत तुपकर यांनी केलेली आहेत. त्याची अनेक उदाहरणे आहेत. थोडक्यात काही उदाहरणे द्यायची झाल्यास सगळ्यात पहिले उदाहरण देता येईल, ते 2012 मध्ये पातुर्डा येथे बस अपघातात मृत पावलेल्या भारंबे या दाम्पत्याच्या दोन मुली आणि मुलगा असे तिघे रविकांत तुपकर यांनी कायमस्वरूपी दत्तक घेतले.

शिक्षणासह त्यांची सर्वच जबाबदारी तेव्हापासून तुपकर निभावत आहेत. ही तिन्ही मुले रविकांत तुपकरांनाच आपले वडील मानतात, त्यांनाच बाबा म्हणतात. यातील मोठी मुलगी वालचंद इन्स्टिट्यूट (सांगली) येथे इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. दुसरी मुलगी आणि मुलाचेही उत्तम शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या संकटात तुपकरांनी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून केलेली मोफत मदत अनेकाना जीवदान ठेणारी ठरली, हजारो लोकांना तसेच शिक्षणाच्यानिमित्ताने देशात व परदेशात कोरोनामुळे अडकून पडलेल्या हजारो तरुण-तरुणींना या संकटकाळी आपल्या घरी सुखरूप आणि तत्काळ पोहोचवून देण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले होते.

Buldhana Lok Sabha Constituency
Hit & Run : विदर्भातील 322 पेट्रोल पंपांवर मोठे इंधन संकट...

कोरोनाकाळात अडल्या-नडलेल्यांना भोजन व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा रुग्णांना बेड मिळत नव्हते तेव्हा गावोगावी जनजागृती करून लोकवर्गणी गोळा करून व लोकसहभागातून तुपकरांनी अनेक गावांमध्ये 50 बेडचे ऑक्सिजनसहित असलेले कोरोना सेंटर उभे केले. यातील काही सेंटरला तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली होती. तुपकरांची ही संकल्पना राज्यभर राबविण्याची गरज आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले आणि हेच मॉडेल नंतर प्रशासनाने जिल्हाभरात राबविले.

याच काळात रक्ताचा तुटवडा पाहता कोरोनाकाळात रक्तदान शिबिर घेण्याची हिंमत तुपकरांनी दाखविली व बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील कोरोनाकाळातील हे एकमेव रक्तदान शिबिर ठरले. स्त्री-भ्रूणहत्येच्या चळवळीमध्ये रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांनी राज्यभर मोठी जनजागृती केली. एवढेच नव्हे, तर मुंबईमध्ये या दोघांनीही आपला जीव धोक्यात घालून स्टिंग ऑपरेशन करून चार डॉक्टरांना पकडून दिले होते. ते प्रकरण राज्यभर गाजले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढविण्याची संधी आजपर्यंत मिळाली नाही.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

सत्तेचे किंवा लाभाचे अथवा कोणतेही पद नसताना जिल्हाभरातच नव्हे, तर राज्यभरात शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांची मोठी फौज पाठीशी उभी आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात हक्काचे कार्यकर्ते तर आहेतच सोबतच त्या प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिक, युवक, गावातील प्रतिष्ठित वयोवृद्ध, पुढारी अशा सर्वांशी रविकांत तुपकर यांची अगदी जिव्हाळ्याची नाळ जुळलेली आहे. त्यातून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. सोयाबीन-कापूस आंदोलनादरम्यान नुकतीच संपूर्ण जिल्ह्यातून रविकांत तुपकरांनी एल्गार रथयात्रा काढली असता. जिल्ह्यातील लहान-मोठ्या गावांसह अगदी वाड्या- वस्त्यांवर शेतकरी व तरुणांनी आग्रहाने बोलावून आंदोलनाला तसेच पुढील राजकीय निर्णयाला जाहीर पाठिंबा दर्शविला. कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत शेतकऱ्यांची मुलुखमैदानी तोफ म्हणून व आपल्या हक्काचा माणूस म्हणून तुपकरांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. सर्वच राजकीय पक्षांनी केलेल्या गुपित सर्व्हेमध्येही ही बाब समोर आली आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स, सर्वाधिक लाईक, शेअर्स, कॉमेंट्स असणारा चेहरा म्हणून रविकांत तुपकरच आहेत. त्यांचे स्वतंत्र फेसबुक व इन्स्टाग्राम पेज आहेच. शिवाय त्यांचे कार्यकर्ते, चाहते दररोज रविकांत तुपकरांच्या शेकडो पोस्ट शेअर करतात. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या रिल्सला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. ही सर्व परिस्थिती पाहता सोशल मीडियावर सर्वाधिक दबदबा रविकांत तुपकर यांचाच दिसून येतो.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. सरकारमधील नेत्यांना भोसकणार, असे विधान केल्यामुळे रविकांत तुपकर आणि तेव्हाचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये वाद झाला होता. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक असलेल्या तुपकर यांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवा, असे आक्रमक विधानही केले होते. अलीकडेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी तुपकर यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

शेती आणि मातीशी नाळ जोडलेला प्रत्येक माणूस हा रविकांत तुपकर यांच्यासाठी गुरुस्थानी आहे.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

सध्याच्या परिस्थितीत राजकारणाची दिशा भरकटली आहे. राजकारण आणि राजकीय नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. नको ते राजकारण आणि नको ते पक्ष असे म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. परंतु अशाही परिस्थितीत एक आश्वासक व प्रामाणिक चेहरा म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा नेता, तरुणांचा नेता, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उद्याचे भविष्य यापेक्षा राज्यातील शेतकरी, कष्टकरी व तरुणांचा प्रभावी नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. आपला हक्काचा माणूस सभागृहात गेला पाहिजे यासाठी जिल्हाभरातील शेतकरी तन-मन धनाने रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे आहेत.

लोकवर्गणी करून निवडणुकीला पैसा उभा करण्याची तयारी करत आहेत...नव्हे तर अनेकांनी आतापासूनच वर्गणी देऊ केली आहे. इतर बाबतीत उमेदवाराकडून लोक पैसे घेतात परंतु उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी पैसे जमा करून देणारे एकमेव उदाहरण म्हणून रविकांत तुपकर आहेत. लोकवर्गणीतून रविकांत तुपकर यांना जिल्ह्यातील नागरिकांनी घेऊन दिलेली 32 लाखांची गाडीसोबतच डिझेलसाठी पाच लाखांचा निधी हे त्याचे एक उदाहरण आहे. स्वच्छ प्रतिमा, अत्यंत प्रभावी वक्तृत्वशैली, कोणत्याही विषयाची अभ्यासू मांडणी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तरुण व आक्रमक तेवढाच आश्वासक वाटणारा चेहरा ही तुपकरांची आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल. चळवळ, आंदोलन आणि राजकारण यासोबतच साहित्य, कला आणि क्रीडा या क्षेत्रातदेखील त्यांचा वावर आहे. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने राज्यातील पहिले साहित्य संमेलन बुलढाण्यात आयोजिण्यात रविकांत तुपकर यांचा सिंहाचा वाटा होता.

Buldhana Lok Sabha Constituency
Raju Shetti Vs Ravikant Tupkar : शेट्टींच्या 'स्वाभिमानी'त तुपकर 'साईडलाईन'? सदाभाऊंनीही 'टायमिंग' साधलं

रविकांत तुपकर अतिशय आक्रमक आहेत, त्यांची आंदोलने आक्रमक असतात किंवा प्रसंगी जिवावर बेतणारी असतात. प्रत्येक आंदोलनातून रविकांत तुपकरांनी काहीना काही यशच मिळविले आहे, त्याची प्रचिती अगदी पेरणी व दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा व नुकसानभरपाईची जमा झालेली रक्कम, याद्वारे आली. शिवाय तुपकर यांच्या आंदोलनात मग ते आंदोलन बुलढाण्यात असो नागपूर असो की मुंबईला असो, प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून घेऊन आणि स्वतःच्या पैशांनी, हजारो लोक त्यांच्या एका हाकेवर सहभागी होतात. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सगळ्याच पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सर्वच समाजातून रविकांत तुपकर यांना सकारात्मक पाठिंबा आहे. सातत्याने सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरण्याची हातोटी आणि प्रस्थापित नेत्यांना धडकी भरवणारे व्यक्तिमत्व म्हणूनदेखील रविकांत तुपकर यांची ओळख आहे .

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील सर्वच पक्षातील नेत्यांशी रविकांत तुपकर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे तुपकरांचा स्पष्ट कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, ते नेमके महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोणाकडून लढणार, याबाबत कायमच संभ्रम राहिला आहे आणि तो आजही आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

अभी नही तो कभी नही अशी सुवर्णसंधी यावेळी निर्माण झालेली आहे. अशावेळी त्यांना संधी न मिळाल्यास रविकांत तुपकरांचेच नव्हे, तर एका पिढीचे आणि शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान होऊ शकते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला एका आश्वासक व तरुण चेहऱ्याची गरज आहे आणि ती गरज रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे रविकांत तुपकर यांना महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारीची संधी न मिळाल्यास जनरेटा पाहता अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवू शकतात.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com