

NCP Leader Chagan Bhujbal in OBC Camp at Nagpur : ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. डेटा तयार करावा लागेल असं त्यांनी सांगितलं होतं, पण ते काम झालं नाही. दुसरी कमिटी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली, मात्र तेव्हाही डेटाचं काम झालं नाही. तेव्हापासून हा प्रश्न रेंगाळत गेला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. (There is no OBC in Mumbai. So that law did not survive)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी कार्यकर्ता शिबिर नागपुरात तीन आणि चार जून रोजी पार पडले. त्यात आज (ता. ४) ते बोलत होते. ते म्हणाले, समीर भुजबळांनी संसदेत हा मुद्दा मांडला होता, अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. शरद पवारांनीही पाठिंबा दिला होता. पण हा तिढा काही सुटला नाही.
२०१६मध्ये जो डेटा आला, तो मोदींकडे गेला. मात्र त्यांनी आकडा जाहीर केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब एक कायदा बनविला, तो टिकला नाही. यासंदर्भात मी आधीच सांगितलं होतं की, तो टिकणार नाही आणि झालंही तसंच. इंपेरिकल डेटा त्यांच्या लोकांनी एअर कंडिशन केबिनमध्ये बसून केला होता. ते म्हणाले मुंबईमध्ये ओबीसी नाही. त्यामुळे तो कायदा टिकला नाही.
मी शिवसेना सोडून आलो ते ओबीसीसाठी. त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली. शरद पवार ओबीसीचा विचार करत होते. म्हणून मी त्यांच्यासोबत आलो, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
आता घाईघाईने एक अहवाल तयार केला आहे. मात्र तो अहवाल आम्हाला मान्य नाही. भाजपने मध्यप्रदेश मध्ये जे काम केलं, ते अपूर्ण आहे. म्हणून आता जनगणना झाली पाहिजे. ज्याप्रमाणे एससी, एसटीला निधी मिळतो, त्याप्रमाणे ओबीसीलाही मिळाला पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ही मागणी अनेक राज्यांत झाली. तीच मागणी आमचीपण आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.
महाज्योतीला फक्त ५० कोटी रुपये दिले इतरांना ३०० कोटीच्या वर दिले. त्यांना द्या मात्र आम्हाला पण द्या. कंत्राटी पद आता भरली जात आहेत. एकतर कंत्राटी पद भरू नये आणि भरली तर त्यातसुद्धा आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ओबीसीसाठी (OBC) वसतिगृह तयार करा. पण ती खाजगी तत्वावरची नसावी. मराठा आणि दलित समाजातील मुलांना वसतिगृह नसेल तर त्यात सात हजार रुपये वर्षाला दिली जातात त्याप्रमाणे आम्हाला पण द्या, अशी मागणी भुजबळांनी केली.
काल ओडिशामध्ये रेल्वेचा एवढा मोठा अपघात झाला. पण कुणीही राजीनामा दिला नाही. याआधी जेव्हा-जेव्हा रेल्वे अपघात झाले, त्यावेळी त्या-त्या रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिले. हे सरकार तेवढे संवेदनशील नाही. सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र (Maharashtra) सदनामधील पुतळा हटवला त्याचा विरोध किती लोकांनी केला, असा सवालही भुजबळांनी (Chagan Bhujbal) केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.