

प्रमोद काकडे
Chandrapur News : चंद्रपूर शहराचा विकास कसा करायचा, याचा आराखडा तयार होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये कोणत्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याचे नियोजन झाले होते. महापौर, उपमहापौरांपासून गटनेतेपदापर्यंत प्रत्येक पदाचे अडीच-अडीच वर्षांचे वाटप करण्यात आले होते. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील सत्तासंघर्षाला तात्पुरता विराम मिळाला असतानाच दोघांमध्ये झालेला लेखी करार तब्बल दहा महिन्यांनंतर सार्वजनिक झाला आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला २७ जागांसह सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मित्रपक्षाच्या मदतीने बहुमताचा आकडाही गाठता येणे शक्य होते. मात्र, निवडून आलेले नगरसेवक आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर अशा दोन गटांत विभागले गेले. त्यामुळे महापौर निवडीपासून गटनेतेपदापर्यंत वाद सुरू झाला. हा संघर्ष दिल्लीपर्यंत पोहोचला.
अखेर दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड होऊन सत्तेतील पदांच्या वाटपाचे लेखी सूत्र निश्चित करण्यात आले. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस समितीच्या कार्यालयात या समजपत्रावर दोन्ही नेत्यांसह माजी मंत्री सुनील केदार, तत्कालीन शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लहामगे आणि राजेश अडूर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार, पहिली अडीच वर्षे महापौरपद धानोरकर यांच्या पसंतीच्या व्यक्तीकडे, तर पुढील अडीच वर्षे वडेट्टीवार यांच्या पसंतीच्या व्यक्तीकडे राहणार होते.
उपमहापौरपद आणि गटनेतेपदाचेही अशाच पद्धतीने वाटप करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली. भाजपने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मदतीने महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली. या दोन्ही नेत्यांतील कराराला पहिला तडा स्थायी समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीवेळी गेला.
गटनेते म्हणून राजेश अडूर यांनी स्थायी समितीसाठी सदस्यांची नावे देताना धानोरकर समर्थक नगरसेवकांना डावलले. करारानुसार स्थायी समितीत दोन्ही गटांना प्रत्येकी ५० टक्के प्रतिनिधित्व द्यायचे होते. मात्र, या अटीचे पालन न झाल्याने धानोरकर गट संतप्त झाला. त्यानंतर बहुमताच्या जोरावर अडूर यांना गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबाले यांची नियुक्ती करण्यात आली.
तत्पूर्वी हा वाद पोलिस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी धानोरकर गटातील काही नगरसेवकांना पुन्हा आपल्या बाजूने वळविले. परिणामी, अडबाले यांनाही गटनेतेपदावरून हटवून पुन्हा राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच गटनेतेपदावरून पुन्हा संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे.
महापौर निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाही, तर पुढील अडीच वर्षांसाठीचे महापौरपद धानोरकर यांच्या सूचनेनुसार देण्यात येईल, अशी तरतूदही या करारात करण्यात आली होती. आता दहा महिन्यांनंतर हा लेखी करार सार्वजनिक झाल्याने काँग्रेसमधील पदवाटपाचे राजकारण आणि नेत्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
आमदार अडबालेंचा एक सदस्य
करारानुसार, १ मार्च २०२८ पूर्वी राजेश अडूर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा देऊन धानोरकर यांच्या पसंतीच्या व्यक्तीसाठी मार्ग मोकळा करायचा होता. स्थायी समितीमध्ये दोन्ही गटांना प्रत्येकी ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याचे ठरले होते. तीन स्वीकृत सदस्यांपैकी प्रत्येकी एक जागा दोन्ही गटांना, तर तिसरी जागा अपक्ष शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सूचनेनुसार देण्याचे निश्चित झाले होते. तसेच स्थायी समितीचे सभापतीपद मित्रपक्षाला देण्याचेही करारात नमूद करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.