

Chandrapur News: नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या असून मित्रपक्षांसह बहुमत मिळवलं आहे. पण एकीकडे सत्तास्थापनेची पूर्ण संधी असतानाही काँग्रेसमधील गटबाजीमुळे सत्तास्थापनेचा दावा करता आलेला नाही. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवारांमधला संघर्ष इतका टोकाला गेला की, अखेर यावर तोडगा काढण्यासाठी नगरसेवकांसह दिल्ली गाठावी लागली. दिल्लीत धानोरकर-वडेट्टीवार वादावर तोडगा निघाल्याची माहिती समोर येत आहे. या वादात धानोरकरांची सरशी झाल्याचं बोललं जात आहे.
आता चंद्रपूर महानगरपालिकेतील वादाबाबत मंगळवारी(ता.3) के सी वेणुगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महापौर तर उपमहापौरपद विजय वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
दिल्लीत चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीला विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हेही उपस्थित होते. मात्र, या बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन सध्यातरी वडेट्टीवार - धानोरकर संघर्षात प्रतिभा धानोरकर यांची सरशी झाल्याचं समोर येत आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही अद्याप सत्ता स्थापन करण्यासाठी कोणीच दावा केलेला नाही. काँग्रेसमधील भांडणे उफाळून आली आहेत. महापौरपदाच्या वादात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. तर वडेट्टीवार यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून यांपैकी धानोरकर गटाकडं 13 तर वडेट्टीवार गटाकडं 14 नगरसेवक आहेत.
चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रभावाखाली स्वतंत्र गटाची नोंदणी केली आणि महापौरपदावर दावा केला. हे करत असताना धनोरकरांनी वडेट्टीवारांवर गटबाजी आणि नगरसेवक पळवण्याचा गंभीर आरोप करत त्यांचा गट म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला.
तर दुसरीकडं वडेट्टीवारांच्या समर्थक नगरसेवकांनी धानोरकर मनमानी करत असल्याचा आरोप करत त्या खासदार असल्या तरी त्यांनी स्वतःला जिल्ह्याचा मालक समजू नये असं म्हटलं आहे. तसंच आमच्या लोकांना त्यांनी ऑफरही दिल्याचे आरोप वडेट्टीवारांच्या नगरसेवकांनी केले.
66 सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपकडे 23 सदस्य आहेत. काँग्रेसला बहुमतासाठी 6 तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे. उद्धव ठाकरे सेनेने वंचित आघाडीला सोबत घेऊन 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आणखीच पेच वाढला आहे. जनविकास सेनेचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघांचीही अडचण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.