
Nagpur News : यापूर्वीच अनेक निर्णय वादग्रस्त ठरले असताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी पुन्हा एकदा अधिकार नसताना विस्तारित कार्यकारिणी जाहीर करून वाद ओढावून घेतला आहे. विशेष म्हणजे बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी कार्यकारिणी जाहीर केली आणि राष्ट्रीय नेत्यांनी शुक्रवारी (ता.21) ती फेटाळून लावली आहे. एवढेच नव्हे तर शिस्तपालन समितीला याची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले आहे.
कुणाल राऊत यांनी बुधवारी (ता.19) मध्यरात्री आपल्या अधिकार क्षेत्रात नऊ कार्याध्यक्ष, 22 उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, जिल्हाध्यक्ष अशी एकूण सुमारे दीडशे लोकांची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली होती. सोबतच सर्वांना शुभेच्छा देणारा एक व्हीडीओ जारी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी अजय चिकारा, राष्ट्रीय सचिव व सहप्रभारी कुमार रोहित आणि एहसान अहमद खान ही कार्यकारिणी फेटाळून लावली आहे.
कार्यकारिणी निवडताना अध्यक्षांनी कुठलीच प्रक्रिया पार पाडली नसल्याचे सांगून राष्ट्रीय सचिवांनी शिस्त पालन समितीला याची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे कुणाल राऊत पुन्हा तोंडघशी पडले आहेत.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वर्षांपासून आपसात संघर्ष सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. नेमून दिलेले कामे नियोजित वेळेत केले नाही असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले होते.
त्यानंतरही कोणावरच कारवाई झाली नव्हती. अलीकडेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात नागपूरच्या संघ बिल्डिंगसमोर युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला अनुपस्थित असलेल्या सुमारे ५० पदाधिकाऱ्यांना एकाच दिवशी पदमुक्त करण्यात आले होते. त्यावरून मोठा असंतोष युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उसळला होता.
या आंदोलनाला अनुपस्थित असलेल्या सुमारे ५० पदाधिकाऱ्यांना एकाच दिवशी पदमुक्त करण्यात आले होते. त्यावरून मोठा असंतोष युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उसळला होता. आंदोलनाची तारीख आणि वेळ दोनदा बदलली. वेळेवर आंदोलन करण्यात आले. वेळेत सूचना मिळाली नसल्याने आंदोलनात उपस्थित राहाता आले नसल्याचे पदमुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले नव्हते.
पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी दाणी, आमदार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या मुलांचा व मोठ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. हा वाद दिल्लीतही पोहचला होता.
कुणाल राऊत यांचे वादग्रस्त निर्णय आणि कार्यकाळ बघून राष्ट्रीयस्तरावरून शिवराज मोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राऊत यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. नव्याने निवडणूक जाहीर व्हायची असल्याने त्यांना तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे.
ते सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. असे असताना त्यांनी अधिकार नसताना विस्तारित कार्यकारिणी जाहीर करून पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. राऊत यांना पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढायची आहे. त्यामुळे ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कारवाई करीत असल्याचा आरोप अनेक पदाधिकाऱ्यांचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.