
Chandrapur News : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्रिपदासाठी पत्ता कट झाला. यानंतर मुनगंटीवार यांची नाराजी लपून राहिलेली नाही.पण आता त्यांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्टेजशेअर करणं टाळल्याची चर्चा आहे. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फडणवीसांबाबत केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जसं राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो,तसा मित्रही नसतो. याचाच प्रत्यय शुक्रवारी चंद्रपूरमध्ये आला.कारण विरोध करताना एकमेकांवर अक्षरश: तुटून पडणार्या माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) तोंडभरुन कौतुक करताना दिसून आले. त्यांनी फडणवीसांचा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुढील वारसदार म्हणून केलेल्या उल्लेखामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.10)वी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं. याचमुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले,एका माजी मुख्यमंत्र्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत, हा मनाचा मोठेपणा असतो. त्यावेळी आम्ही मारोतराव कन्नमवारजी यांच्याकडे यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून बघत असत. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वारसदार व्हावं,असं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
माजी मुख्यमंत्री कन्नमवारजी यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठं काम केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची सुरुवात त्यांच्याकडून झाली. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री तेच झाले होते. त्यांनी विकासाची पायाभरणी केली, या विकासाचे कळस म्हणून देवेंद्रजी काम करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असं कौतुकही विजय वडेट्टीवार यांनी केले.
आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले,कन्नमवार यांनी खूप कष्टातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. पेपर वाटण्यापासून ते पुढे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खूप मोठं काम केलं. त्यांच्याच कामाला फडणवीस पुढे घेऊन जात आहे. आता त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक म्हणून स्विकारले पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केलं. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात देशाचं नेतृत्व कराल,असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
चंद्रपूर येथे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या 125 वी जयंती कार्यक्रमातील अनुपस्थितीवर सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले,माझ्या गैरहजेरीबाबत मुख्यमंत्र्यांशी माझी सकाळीच चर्चा झाली. काल मला निमंत्रण आलं तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा कॉलही आला. मात्र, काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईत असल्याने आज या कार्यक्रमाला येणं शक्य होणार नाही.
कन्नमवारांचा सन्मान मी केला,त्यांचे स्मारक मीच केलं आहे. त्याचे कोणीही राजकारण करु नये. निवडणूक यश व अपयशावर चिंतन करायचे असते. त्यावर चर्चा करून काय मत मांडतात,यावर जनतेचे लक्ष असते. गेलेले क्षण विजयात बदलता येत नाहीत. शांततेत विश्लेषण करायला हवे. पराभवानंतर विजयाकडे जाता येतं असा टोलाही मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.